करमाळा (सोलापूर) : स्वतंत्र आरक्षणाचा फायदा ठराविक मराठ्यांनाच मिळणार आहे. आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातील कुणबी म्हणून आमचे आरक्षण आम्हाला द्या, अशी आहे. सगेसोयऱ्यांना कुणबी आरक्षण मिळालंच पाहिजे, असे मत मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दिवेगव्हाण येथे सकल मराठा समाज यांच्या वतीने आयोजित सभेत व्यक्त केले आहे.
मराठा बांधवांनो अशीच एकजूट कायम ठेवा मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही येथे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपले प्रमुख ध्येय मराठा आरक्षण आहे. त्याबद्दलची घोषणा आचारसंहितेपूर्वी होईल, अशी आशा त्यांना होती. तुमचा शब्द खाली जाऊ नये व परिसरात अपमान होऊ नये म्हणून येथे येणे गरजेचे होते. त्यामुळे मी येथे आलो.
सुरुवातीला फटाक्यांच्या आतषबाजीत मराठा समाज बांधवांनी मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत केले. मनोज जरांगे पाटील यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना दिली. आंतरवाली सराटी येथे प्रयाण करण्यापूर्वी दिवेगव्हाण ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून एक कोटी खर्च करून बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जीसीबीतून फुलाची पुष्पवृष्टी करण्यात आली. सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने तरुणांच्या भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ उपस्थित होते. यावेळी आलेल्या मराठा बांधवांना अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी एक मराठा एक कोटी मराठा, जय जिजाऊ जय शिवराय ,मराठा आरक्षण आमच्या हक्काचे… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळाले नाही तर विधिमंडळात पारित होऊ घातलेल्या मराठा आरक्षण विधेयकाचा बहुतांश समाजाला कोणताही फायदा नसल्याचे सांगितले. सरकारने दिलेल्या आरक्षणाचा फायदा केंद्र राज्य सरकारने दिलेल्या नोकरीत होणार नसुन हे आरक्षण टिकणारे नसुन न्यायालयात हे रद्द होणार आहे. सरकारने दिलेल्या आरक्षणांमधून ज्यांना नोकरी मिळाल्या ज्याची नियुक्ती झाली आहे. त्यांनाही अद्यापही नोकरीवर रुजू होता आले नाही आणि जे नोकरीला आहेत. त्यांच्या डोक्यावर आरक्षण रद्द झाल्यानंतर नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम असून याकरिता सरकारने ई डब्लू एसमधुन १० टक्के आरक्षण लागू केले असते तर काही प्रमाणामध्ये त्याचा लाभ मराठा समाजाला झाला असता. त्यामुळेच आम्ही ओबीसी मधूनच सगळे सोयरेची अंमलबजावणी करून आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
दोन-तीन लोकांना मराठा समाजाचं वाट्टोळं करायचं आहे. यापूर्वी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले. तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या, पण नियुक्त्या झाल्या नाहीत. या पोरांच्या हातात आता पेन हवा होता, पण आज या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे. त्यांचं वय निघून जात आहे. आताही मराठा आरक्षण टिकलं नाही तर तेच होणार. त्यापेक्षा आम्हाला ओबीसीत असणारं आमचं आरक्षण द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण मराठा समाजाचे नुकसान करणारे आहे. तुम्हाला दोन-तीन लोक महत्त्वाचे आहेत की ६ करोड मराठा महत्त्वाचे आहेत, असा सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी विचारला.यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळसर यांनी मराठा आरक्षणावर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मराठा समाजाला ओबीसीमधुनच आरक्षण मिळाले पाहिजे तर या आरक्षणाचा लाभ केंद्र राज्य सरकारच्या नोकरीमध्ये होणार असल्याने स्वतंत्र आरक्षणापेक्षा ओबीसीमधुन सगेसोयरे अंमलबजावणी करून आरक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथे सत्तर एकरात सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला मराठा समाज बांधव युवक भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.