मारकड वस्ती शाळेचा झंजावात

करमाळा (सोलापूर) : वीट येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत लहान मुलींच्या गटात मारकड वस्ती शाळेने हिवरवाडी संघावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच मारकड वस्तीच्या मुलींनी आक्रमक खेळाची छाप सोडली. अचूक पकडी, वेगवान चढाया आणि संघभावनेच्या जोरावर त्यांनी हिवरवाडी संघाला वारंवार बचावावर ठेवले. मध्यंतरानंतरदेखील त्यांच्या खेळाचा वेग अबाधित राहिला आणि अखेर निर्णायक गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावावर केला.

या उल्लेखनीय विजयामागे मुख्याध्यापक तात्यासाहेब जगताप यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच शिक्षिका स्वाती पाटील यांच्या काटेकोर प्रशिक्षणाचा मोलाचा वाटा असल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले. गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, बिटविस्तार अधिकारी जयवंत नलवडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या.

गणेश मारकड, सागर शिनगारे, रामदास मकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या विजयानंतर मारकड वस्ती शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मुलींच्या दमदार खेळाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *