करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार नारायण पाटील यांनी मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तालुक्यातील विकास कामाबाबत निधी मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी या भेटी घेतल्या आहेत. मात्र त्यांच्या भेटींनी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
आमदार पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार कार्यकर्त आहे. त्यात पाटील हे विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे विकासाला अडथळा निर्माण होईल, अशी चर्चा आहे. मात्र आमदार पाटील यांनी विकासासाठी मंत्र्यांच्या भेटी सुरु केल्या आहेत. त्यातून विकास निधी मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. याचा कसा परिणाम होणार हे पहावे लागणार आहे, मात्र सध्या तरी त्यांनी निधी मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसत आहे.
२०१४ मध्ये पाटील हे पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये संजयमामा शिंदे हे आमदार झाले. त्यानंतर २०२४ मध्ये शिंदे यांचा पराभव करत पाटील आमदार झाले. पाटील आमदार झाले मात्र सरकार विरोधी गटाचे आल्याने निधीबाबत चर्चा केल्या जाऊ लागल्या. २०१४ मध्ये शिंदे महायुतीचे आमदार होते. तेव्हाही फडणवीस यांच्याच मार्गदर्शनाखालील महायुतीचे सरकार होते.
पुढे राज्यात राजकीय परिस्थिती बदलली. त्यानुसार आमदार पाटील यांनीही भूमिका बदलल्या. महाविकास आघाडी सरकार असतानाही ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होते. पुढे शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांना पाठींबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले होते. त्यात ते यशस्वीही झाले. विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले आणि आता मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांची आमदार पाटील यांनी मुंबईत भेट घेतली. विकास कामाबाबत त्यांनी चर्चाही केली आहे. कृषिमंत्री कोकाटे यांच्याशी केळी संशोधन केंद्राबाबत चर्चा केली आहे. मंत्री अबिंटकर, प्रतापराव सरनाईक, शंभूराज देसाई यांच्याशीही त्यांनी चर्चा केली आहे. उजनी पर्यटन विकास आराखड्याबाबत त्यांनी चर्चा केली असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीही त्यांनी सोलापुरात भेट घेतली होती, अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.