करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा जाहीर केल्यानंतर आज (रविवार) माजी आमदार जयवंतराव जगताप व शरद पवार यांची इंदापूर येथे भेट झाली आहे. ‘सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी काम करा’, असे पवार यांनी सूचित केले असल्याचे माजी आमदार जगताप यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर जगताप व पाटील एकत्र आल्यानंतर काल (शनिवार) पहिली सभा झाली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार रोहित पवार उपस्थित होते. ‘करमाळ्यातून माजी आमदार पाटील यांना विजयी करण्यासाठी जगताप गटाचे सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत’, असे माजी आमदार जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
इंदापूर येथे आज शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. तेव्हा माजी आमदार जगताप यांच्यासह हर्षवर्धन पाटील, माजी आमदार नारायण पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते. माजी आमदार जगताप म्हणाले, ‘शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. आज झालेल्या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताने विजयी करण्यासाठी काम करण्याचे त्यांनी सांगितले. करमाळ्यात त्यांची सभा होणार असून त्यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.’