करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नागोर्ली येथील फार्महाऊसवर आज (मंगळवार) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ३६ मिनिटांच्या भाषणात पाच मिनिटात तब्बल सात वेळा मुस्लिम समाज बांधवांचा उल्लेख केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी हा शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर काम करणारा पक्ष आहे, असे सांगत त्यांनी मुस्लिम बांधवांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी माजी आमदार शिंदे यांच्यासह कल्याणराव काळे, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, रणजित शिंदे आदी उपस्थित होते.
राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या पक्षाचे (महायुती) सरकार आहे. काही दिवसांपासून हिंदू आक्रोश मोर्चे निघत आहेत. दोन दिवसांपासून पुण्यातील शनिवार वाडा येथील नमाज पठण हा मुद्दा गाजत आहे. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावर आवाज उठवला आहे. त्याला राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे या उत्तर देत आहेत. दुसरीकडे आमदार संग्राम जगताप हिंदू आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मुस्लिम बांधवाना टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी करमाळ्यात फक्त हिंदूंकडून खरेदी करा असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना समजही दिली होती. मात्र तरीही त्यांची विधाने थांबलेली नाहीत. यातून राष्ट्रवादीपासून मुस्लिम समाज दुरावला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. अशात आज भरणे यांनी त्यांच्या भाषणात मुस्लिम समाजाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या भाषणात या समाजाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
मंत्री भरणे म्हणाले, ‘मुस्लिम समाजाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडे कल आहे. हिंदू मुस्लिम भाई- भाई हे फक्त म्हणण्यापेक्षा ते कृतीतून दिसले पाहिजे. एखादा नेता मुस्लिम बांधवाबद्दल चुकीचं बोलत असेल तर त्याला परखडपणे उत्तर देणारा राज्यात एकच नेता आहे तो म्हणजे अजित पवार!’ असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले ‘मुस्लिम समाजाने अजित पवार यांचे काम जाणले आहे त्यामुळे मुस्लिम समाज पक्षाकडे वाढला आहे. मुस्लिम समाज पक्षाकडे कसे बांधले जातील याकडे लक्ष देण्याचे’ आवाहन मंत्री भरणे यांनी कार्यकर्त्यांना केला. ‘गेल्यावेळी काही घटना घडल्या त्याला टिंबटिंब पक्षाचा पाठिंबा आहे. त्याचा परिणाम होऊ नये याची काळजी घ्या. मुस्लिम बांधव पक्षाशी कसे जोडले जातील हे पहा’, असे आवाहन त्यांनी केले. पुढे ते म्हणाले ‘आमचा राष्ट्रवादी हा पक्ष शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर चालणार आहे. त्यांचे विचार मांडणारा पक्ष आहे. आम्ही कधीही जातीभेद करत नाही. आम्ही धर्मभेद करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे आम्ही आहोत. दलित व अल्पसंख्याक असे छोटे छोटे घटक जोडण्याचे काम आम्ही करत आहोत.’