सभासदांनो योग्य निर्णय घ्या, ‘आदिनाथ’च्या मागे मोहिते पाटलांचे राजकारण : माजी आमदार शिंदे

करमाळा (सोलापूर) : ‘सभासदांनो योग्य निर्णय घ्या, शेतकऱ्यांची अस्मिता असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मागे मोहिते पाटलांचे राजकारण आहे. हा कारखाना मला राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी हवा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून दररोज एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत.

माजी आमदार शिंदे म्हणाले, आदिनाथ कारखाना सुरु करण्याची क्षमता कोणामध्ये आहे हे ओळखा. मी कारखान्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देणार आहे. विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग, सहकार महर्षी व आदिनाथ हे सर्व कारखाने उजनीच्या पाण्यामुळे अस्तित्वात आलेले आहेत. पण आज यामध्ये फरक पडला आहे. मोहिते पाटलांचा सहकारमहर्षीचा दर हा शिंदे परिचारकांच्या कारखान्यापेक्षा कायम टनाला ३०० रुपयांनी कमी आहे. यामुळे माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांच्या कारखान्याला ऊस घालण्याची शेतकऱ्यांची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे त्या कारखान्याचे गाळप सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यासाठी आता त्यांना नवीन बाजारपेठ शोधायची आहे. म्हणून त्यांनी करमाळा तालुक्यातील आमदार नारायण पाटील यांना पुढे करून आदिनाथ ताब्यात घेण्याचे मनसुबे आखले आहेत, असा आरोप केला आहे.

‘आदिनाथ कारखाना चालणारच नाही आणि सुरु करण्याचा प्रयत्न झाला तरी गाळप होऊ शकले नाही तर आदिनाथतर्फे सहकारमहर्षी असा ऊस पाठवायचा. आमदार पाटील यांच्याकडे ऊस गाळप करण्यासाठी साधे गुराळ सुद्धा नाही. मग कार्यकर्त्यांचे ऊस घालण्यासाठी ते सहकार महर्षीच्या वळचणीला आदिनाथ कारखाना बांधतील. मुळातच अडचणीत असलेला सहकार महर्षी कारखाना शेतकऱ्यांना उच्चांकी दर देऊ शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. आदिनाथची निवडणूक दिसते तेवढी साधी, सोपी, सरळ नाही त्यामागे राजकारण व अर्थकारण आहे’, असे शिंदे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *