करमाळा (सोलापूर) : शहरातील उर्दू शाळेला नववी व दहावीच्या तुकडीला मान्यता दिल्याबद्दल करमाळा तालुका सकल मुस्लिम समाजाच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व या कामासाठी प्रयत्न करणारे करमाळ्याचे सुपुत्र व मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा बुधवारी (ता. २८) सत्कार केला जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता नालबंद मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम होणार आहे.
करमाळा तालुक्यातील मुस्लिम समाजासह शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे, असे आव्हान करमाळा तालुका मुस्लिम समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा शहरातील उर्दू शाळेत नववी व दहावीच्या वर्गाला मान्यता नसल्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवीतूनच शाळा सोडून दिल्यानंतर पुढील शिक्षणाची सोय होत नव्हती.
आठवीची शाळा झाल्यानंतर उर्दू शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण मिळत नव्हते.
अनेक वर्षांपासून उर्दू शाळेची व्यवस्थापन समिती व मुस्लिम समाजाचे प्रमुख पदाधिकारी या शाळेला नववी ते दहावीची तुकडी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा विचार करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या दोन वर्गांना मान्यता दिली. यामुळे करमाळा तालुक्यातील सकल मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
केसरकर यांचा सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करमाळ्यात कार्यक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला कंदर, केम, जेऊर, आवाटीसह करमाळा शहर व परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.