करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘नोकराने किती बोलावे याचे भान ठेवले पाहिजे. तेथे ते चपला उचलायचे काम करत आहेत’, असे म्हणत बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे नाव न घेता आमदार नारायण पाटील यांनी टीका केली आहे. मोहिते पाटील, जगताप यांच्याबरोबरची युती का तुटली? यावरही भाष्य करत ‘आपल्याकडे असलेले उमेदवार हे राजे आहेत त्यांना निवडणुकीत विजयी करा’, असे आवाहन त्यांनी केले आहे.
करमाळा तालुका विकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आमदार पाटील यांच्या उपस्थितीत केत्तूर २ येथे सभा झाली. आमदार पाटील म्हणाले, ‘आमदार म्हणून काम करत असताना मतदारसंघात कधीच राजकारण केले नाही. कोणत्याही राजकीय गटाचा कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करत आहे. त्यात कधीही राजकारण केले नाही,’ असे सांगतानाच ‘जो माझ्याशी वाकडा चालतो तो त्यालाही आपण वाकडेच चालतो’, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, ‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण दिलेल्या उमेदवारांना विजयी करा. भविष्यात आणखी कामे करायची आहेत. विधानसभेत तुम्ही विजयी केले आहे. त्यामुळे राहिलेली कामे देखील आपण मार्गी लावणार आहोत. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे,’ असे ते म्हणाले.
‘सध्या माझ्या विरुद्ध अनेक गट एकत्र आले आहेत. ते विकासासाठी नाही तर त्यांच्या स्वार्थासाठी आले आहेत. निवडणुका झाल्यानंतर ते पुन्हा वेगळे दिसतील. मी वस्वतंत्र लढण्याचा घाट घातला नव्हता. मात्र मला एकटं पाडण्यात आले आहे. अकलूज येथे जगताप यांच्या उपस्थितीत जागा वाटप ठरलं होते. मी अकलूज येथे माझ्याकडे एबीफॉर्म मागितले होते. येथील मी लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे माझ्याकडे एबीफॉर्म देणे आवश्यक होते. मात्र मला वेगळे पाडण्यात आले. आता मला हरवण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. मात्र तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात. ‘यांनी’ कारखाने बंद पाडले आहेत,’ असे म्हणत आमदार पाटील यांनी बागल व शिंदे यांनाही टोला लगावला. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल, राजभाऊ कदम, ऍड. नितिनराजे भोसले आदींची यावेळी भाषणे झाले. प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
