करमाळा : आमदार नारायण पाटील यांनी ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यास जोडणारा उजनी जलाशयावर असलेला ब्रिटिशकालीन पुलाचा भरावाचा काही भाग ढासळल्याने करमाळा व इंदापूर या दोन तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटला होता. हा पुल उजनी जलाशयातील सध्या वाढत असलेल्या पाण्यामुळे ढासळला गेला. तेथे तत्काळ आमदार नारायण पाटील यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली होती.
नागरिकांच्या दळणवळणाच्या समस्या जाणून घेतल्या व लहान वाहनांसाठी वाहतुकीस परवानगी मिळावी, अशी भुमिका नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार संबंधित विभागाकडे त्यांनी व्यक्त केली. यावर लहान वाहनांसाठी प्रवेश दिला. आता या पुलाची तातडीने दुरुस्ती झाली पाहिजे यासाठी आमदार पाटील यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले असून आता त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली आहे. त्यांना या पुलाची सद्यस्थिती व हा पुल किती महत्वाचा आहे हे त्यांना सविस्तर सांगितले. तसेच या पुलाची तातडीने दुरुस्ती केली जावी अशी मागणी केली. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन लवकरच या जुन्या पुलाची दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगितले आहे.