करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीपैकी उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. उर्वरित 15 ग्रामपंचायतीचे निकाल आज (सोमवारी) हाती आले. त्यामध्ये आमदार संजयमामा शिंदे गटाने गौंडरे, रामवाडी, घोटी, वीट व निंभोरे ग्रामपंचायतवर निर्विवाद सत्ता मिळवली असून गौंडरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आमदार संजयमामा शिंदे गटाचे सुभाष हानपुडे, रामवाडीत गौरव झांजुर्णी, घोटीत विलास राऊत, निंभोरेत रवींद्र वळेकर तर वीट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी महेश गणगे यांची निवड झाली आहे.
केत्तूर, कंदर व चिखलठाण या तीन ग्रामपंचायतीमध्ये बागल, पाटील युतीसह आमदार शिंदे गट सत्तेत सहभागी असून केत्तूर 5 सदस्य, चिखलठाण 5 सदस्य व कंदर 3 सदस्य आमदार शिंदे गटाचे निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीव्यतिरिक्त केम ग्रामपंचायतमध्ये मोहिते पाटील गटाला सरपंच पद मिळाले असले तरी विरोधी गटाचे १० सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये शिंदे गटही सहभागी आहे. राजुरी ग्रामपंचायतचे सरपंचपद आमदार शिंदे गटाला मिळाले नसले तरीही त्या ग्रामपंचायतमध्ये 6 सदस्य आमदार शिंदे गटाचे निवडून आले आहेत. कावळवाडी, भगतवाडी या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी 2 सदस्य, रायगाव ग्रामपंचायतमध्ये 1 सदस्य शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत, असा दावा करत विजयी सरपंच व सदस्यांचे आमदार संजयमामा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.