करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे यांची माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटाने साथ सोडली. त्यामुळे आमदार शिंदे गटाला मोठा फटका बसू शकत होता. मात्र त्यामुळे होणार तोटा भरून काढण्याचे काम शिंदे गटाकडून सुरु आहे. करमाळा शहरात चिवटे व देवी गटाने अपक्ष आमदार शिंदे यांचे ‘सफरचंद’ हाती घेतले आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचे बळ वाढणार आहे.
करमाळा भुषण माजी नगराध्यक्ष स्व. गिरधरदास देवी यांच्या निवासस्थानी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना गणेश चिवटे यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांचे सहकारी रामभाऊ ढाणे, जगदिश आग्रवाल, अमोल पवार, गणेश महाडीक उपस्थित होते. आमदार शिंदे यांचे समर्थक करमाळा अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष कन्हैयालाल देवी, माजी नगरसेवक प्रवीण जाधव, माजी संचालक चंद्रकांत चुंबळकर, मनसेचे नाना मोरे, अशपाक जमादार, महादेव फंड आदी उपस्थित होते.
जगताप व सावंत गटाने माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा दिल्यानंतर शिंदे गटाला फटका बसला असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर देवी गट काय करेल याबाबतही प्रश्न केले जात होते. मात्र देवी स्वतः आमदार शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत, असे चित्र आहे. गिरिधरदास देवी यांचा फोटो वापरला जाऊ लागला असून चिवटे यांनी पाठींबा दिल्याने आमदार शिंदे यांचे बळ वाढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.