करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार आमदार आमदार संजयमामा शिंदे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये करमाळा शहराच्या हद्दवाढीसह नवीन विकास आराखडा व शेती, वीज, आरोग्य व शिक्षण य घटकावर भर देण्यात आला आहे. करमाळ्यात केळी संशोधन केंद्र सुरु करणे व कृषी महाविद्यालय सुरु करण्याचा मानस असल्याचे आमदार शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. करमाळ्यातील ११८ व माढा तालुक्यातील ३६ गावांमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. ‘२०१९ ते २४ दरम्यान केलेल्या विकास कामांमुळे माझ्यावर मतदारांचा विश्वास आहे. नेते एका बाजूला आणि मतदार एका अशी स्थिती असून ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे’, असे आमदार शिंदे यांनी एका सभेत स्पष्ट केले आहे.
‘करमाळ्यातील मतदाराच्या विश्वासास पात्र राहून मी येणाऱ्या काळात काम करणार आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून मी करमाळ्याला निधी देतो आहे. विकास काम करताना कधीही राजकारण केले नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी काम केले आहे. तो विरोधक की माझा हे कधीच पाहिले नाही, असे ते म्हणाले आहेत.
आमदार शिंदे यांच्या जाहीरनाम्यातील मुद्दे
१) कुकडी उजनी योजना सुरु करण्यासाठी काम प्रयत्न करणार असून या माध्यमातून ४० गावातील २४ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणणार
२) दहिगाव उपसासिंचन योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी १२ गावांचा सर्व्हे करून बंद नलिकेतून बचत होणारे पाणी उचलण्यास परवानगी मिळवून देण्यावर भर राहणार
३) मराठवाड्याला पाणी जाणाऱ्या बोगद्याच्या ९ शॉफ्टद्वारे पाणी उचलण्याची परवानगी मिळवण्यावर भर देणार
४) सीना माढा उपसासिंचन योजनेचे पाणी बेंद ओढ्यात सोडले जाणार
५) सौन्देत १३२ केव्ही वीज उपकेंद्र उभारणार व सावडीत ७६५ केव्ही वीज उपकेंद्र उभारणार
६) करमाळा शहरात नवीन पाणी पुरवठा योजना केली जाणार. नवीन विकास आराखडा तयार केला जाणार व विस्तारीकरण केले जाणार.
७) मांगी एमआयडीसी येथे पाणी पुरवठा योजना सुरु करणे व येथे नामांकित कंपन्या आणून रोजगार निर्मिती केली जाणार.