महावितरणच्या ३० दिवसांच्या थकबाकीदार कनेक्शन कटाच्या अटीवर मनसेचा तीव्र निषेध

करमाळा (सोलापूर) : राज्यात महावितरण कंपनीकडून नागरिकांची होत असलेल्या पिळवणुकीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे. नवीन स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना दिलेल्या आश्वासनांचा भंग करत, केवळ ३० दिवसांच्या थकबाकीवर वीज कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी म्हटले आहे की, ‘नवीन सिमकार्ड असलेली स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना सांगण्यात आले होते की, आता वीज बिल वाचनासाठी मीटरजवळ जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वेळेवर बिल मिळेल, एवढेच सांगण्यात आले. मात्र, बिल थकल्यास केवळ ३० दिवसांत कनेक्शन कापले जाईल, ही अट कधीच ग्राहकांना सांगण्यात आली नव्हती किंवा जाहीरही करण्यात आली नव्हती.’

घोलप यांनी या नियमाला जाचक आणि अमानवीय ठरवले. सध्याच्या महागाईच्या काळात, सरकारी कर्मचारी असो वा शेतकरी, सर्वसामान्यांची आर्थिक उलाढाल मंद गतीने होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “अशा परिस्थितीत केवळ एका महिन्याच्या थकबाकीवर वीज कनेक्शन तोडणे म्हणजे गोरगरीबांना विजेपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ही अट इंग्रजांच्या काळातील जाचक कायद्यांप्रमाणे असून, नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे, असे ते म्हणाले.

या प्रश्नी लवकरच पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसैनिक राज्यभर रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला. सरकार जनतेच्या हितासाठी आहे की महामंडळाच्या ठेकेदारांच्या हितासाठी, हे लोकांना कळायला हवे, असे टीकात्मक वक्तव्य करत त्यांनी सरकारचा हा निर्णय जनविरोधी असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *