करमाळा : तालुक्यात पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बाधित ५६ हजार शेतकऱ्यांची यादी मदतीसाठी सरकारकडे पाठवण्यात आली आहे. त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारी सायंकाळी मदत जमा झाली असून काही शेतकऱ्यांच्या त्रुटी आहेत. त्याची दुरुस्ती केली जात आहे. काही शेतकऱ्यांचे फार्मरआयडी नाहीत त्यांनी तत्काळ फार्मरआयडी काढून घ्यावेत व दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले आहे.
करमाळा तालुक्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी आणि सीना नदीला पूर आला होता. यामुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारची मदत मिळावी यासाठी प्रशासनाने अतिशय प्रयत्न केले. पंचनामे करण्यासाठी शेतात जाणे कठीण होते तरीही परिश्रम घेऊन पंचनामे करून याद्या तयार करण्यात आल्या. एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. आता अनेक शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा झाले आहेत.
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, ‘शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जात आहे. कृषी, महसूल, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतात जाऊन पंचनामे केले आहेत. ज्याच्या घरात पुराचे पाणी गेले होते त्यांना तत्काळ १० हजाराची मदत देण्यात आली होती. आता शेतकऱ्यांचीही मदत जमा झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांचे फार्मरआयडी काढणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावात व बँक अकाऊंट व आधार कार्ड चूक होती त्यात दुरुस्ती करणे सुरु आहे. प्रशासनस्तरावर ज्या दुरुस्ती करता येत आहेत त्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांचीही त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर पैसे जमा होतील.

 
		 
		 
		