करमाळा (अशोक मुरूमकर) : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल व जगताप गटाच्या आवाहनानंतर आज (मंगळवारी) २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. बुधवारी (ता. २ एप्रिल) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र एकच दिवस मागे घेण्याचा राहिला असल्याने शिंदे व पाटील गटामध्ये आज प्रचंड राजकीय हालचाली दिसून आल्या.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. त्यामुळे हा कारखाना बिनविरोध करण्याचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले होते. मात्र त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. यामध्ये तब्बल २७२ अर्ज आले होते. दरम्यान बागल गटाने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर जगताप गटाने देखील माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज अर्ज मागे आले आहेत.
मंगळवारी जेऊर ऊस उत्पादक गटातून महादेव कामटे, अतुल गोडगे व लक्ष्मण गोडगे यांनी अर्ज मागे घेतले. महिला राखीवमधून मनीषा ढेरे व तारामती पाटील यांनी अर्ज मागे घेतले. भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीमधून नानासाहेब शिंदे, नागनाथ लकडे, तुकाराम कोळेकर व दिगंबर नाझरकर यांनी अर्ज मागे घेतले. इतर मागास प्रवर्गमधून राजाराम जाधव यांनी माघार घेतली. रावगाव ऊस उत्पादक गटातून नानासाहेब शिंदे, अजिनाथ शिरगिरे व हरिश्चंद्र झिंजाडे यांनी अर्ज मागे घेतले. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मतदारसंघातून प्रकाश लोंढे यांनी माघार घेतली. पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून दत्तात्रय गायकवाड, निवृत्ती निकम व रणजित शिंदे यांनी माघार घेतली. सालसे ऊस उत्पादक गटातून शिवाजी ढवळे, अंगद मोरे पाटील व देवराव सरडे यांनी माघार घेतली. केम ऊस उत्पादक गटातून महावीर तळेकर व अजिनाथ फरतडे यांनी माघार घेतली.
अर्ज मागे घेण्यासाठी बुधवार शेवटचा दिवस असल्याने पाटील व शिंदे गट काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रा. रामदास झोळ यांच्या समर्थकांचे देखील अर्ज आहेत. त्यामुळे ते काय करतील हे पहावे लागणार आहे. आज मोहिते पाटील यांनी पाटील व जगताप यांची बैठक बोलावली होती, अशी माहिती आहे. तर शिंदे यांनीही त्यांच्या समर्थकांची नागोरली येथे बैठक घेऊन विचारविनियम केला आहे. यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, ‘कारखाना बिनविरोधचा प्रस्ताव आपल्याकडे आला होता. त्यावर आपणही चर्चा करत प्रतिसाद दिला आहे. मात्र बाजार समिती बिनविरोध करताना शिंदे गटाबद्दल जे बोलत होते त्यांना आता आधी अर्ज काढावेत. कारखाना अडचणीत आहे. त्याला बाहेर काढणे आवश्यक आहे. मात्र याच्या आडून काहीजण राजकारण करत आहेत. महायुतीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढणार असल्याचे पुन्हा एखादा त्यांनी स्पष्ट केले आहे.