करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज (सोमवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात आमदार शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी तालुक्यातील पांडे, वीट, कोर्टी, केम, वांगी, रावगाव, कुंभेज, केत्तूर, साडे व जेऊर या गणातील प्रत्येक गावांमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर गावातील समस्या सांगितल्या. दरम्यान आमदार शिंदे ज्याला सांगतील त्यालाच आम्ही मताधिक्य देऊ, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) बिटरगाव श्री येथील बबनदादा मुरूमकर, बोरगावचे माजी सरपंच विनय ननवरे यांनी खासदार निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे व आमदार शिंदे यांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, भाजपचे गणेश चिवटे, भोसेतील भोजराज सुरवसे, गुळसडीचे दत्तात्रय सुरवसे, देवळालीचे आशिष गायकवाड, चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत सरडे, चंद्रहास निमगिरे, विलास पाटील, कोंढारचिचोलीचे सुहास गलांडे, सरपंच भोसले, आळजापूरचे डॉ. हरिदास केवारे, राजेंद्रराजे भोसले, उदय ढेरे, तुषार शिंदे, राजेंद्र रोडे, कामोणेचे सरपंच रमेश खरात, ऍड. बाळासाहेब नलवडे, ऍड. अजित विघ्ने आदी उपस्थित होते. घारगाव येथील होगले यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध खासदार निंबाळकर व आमदार शिंदे यांनी लक्ष घालावे असे सांगितले.
‘प्रत्येक गावात प्रजन्यमाफक मशीन बसवावे, सीना नदीवरील खडकी, पोटेगाव, तरटगाव, संगोबा बंधाऱ्यातत पाणी सोडण्यात यावे, मांगी तलावात कुकडीचे पाणी सोडण्यात यावे, कुकडी उजनी उपसासिंचन योजना कार्यान्वित करावी, सीना नदीवर करंजे येथे पूल उभारण्यात यावा,’ अशा विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. निधी वाटपात भेदभाव झाला असल्याचा आरोप झरेचे प्रशांत पाटील यांनी केला. मात्र आमदार शिंदे यांचा शब्द प्रमाण मानून आम्ही या निवडणुकीत काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दहिगाव उपसासिंचन योजनेत आमदार शिंदे यांनी मोठे काम केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असेही यावेळी सांगण्यात आले.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा
बोरगावचे माजी सरपंच विनय ननवरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मराठा आरक्षण हा विषय महत्वाचा आहे. त्यामुळे समाजाला विश्वासात घेणे आवश्यक असून समाजाच्या बांधवांवर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार निंबाळकर व आमदार शिंदे यांनी दिले आहे.