पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावना लगतच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने 15 ऑगस्टला ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. त्याला मुस्लिम समुदायाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये मुस्लिम समुदायिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अॅड. हाजी गफूर पठाण यांनी सांगितले.
कोंढवा येथील सतेज हॉल या ठिकाणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाज बांधवांची बैठक झाली. मुस्लिम समुदाय हा कायम आंबेडकरी विचारधारेसोबत जोडला गेला आहे. या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम समुदायाचे मिळालेले पाठबळ अत्यंत महत्त्वपूर्ण असून यामुळे आंदोलकांची ताकद वाढली असल्याने स्मारकाचा लढा सुटण्याच्या मार्गावर आलेला आहे, असे राहुल डंबाळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान पुणे शहरातील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना एकत्रित करून या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज जास्तीत जास्त संख्येने सहभागी होईल याबाबत प्रयत्न केले जाणार असल्याचे अॅड. हाजी गफूर पठाण यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत हसीनाताई इनामदार, आबीद सय्यद, जमीर कागजी, जावेद शेख, एजाज पठाण, बीलाल पटेल, सज्जन कवडे आदी सहभागी झाले होते.
दरम्यान याच अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये मुस्लिम समाजाची बैठक देखील पार पाडली होती याच माजी नगरसेवक रशीद शेख, आयुब शेख, रफिक शेख, मेहबूब नदाफ, रईस सुंडके, मुक्तार शेख, हाजी फिरोज शेख, सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख, अंजुम इनामदार, जुबेर मेमन, सलीम पटेल, आसिफ खान आदीनी पाठिंबा व्यक्त केला आहे.