जन्माने मुस्लिम असुनही अल्ला बरोबरच हिंदू देवदेवतांबद्ल श्रद्धा असलेले गोड आवाजात विठ्ठलाचे भजन म्हणणारे दिवसातून दोन वेळा नियमितपणे नागनाथ मंदीरात देवदर्शनाला येणारे शेटफळ (ता. करमाळा) येथील बाबुभाई हुसेन शेख (वय ८५) यांचे (ता. ११) नागनाथ मंदीरासमोरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
शेख यांचे शेटफळमध्ये एकमेव मुस्लिम कुटंब आहे. मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बाबुभाई यांच्यावर लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. त्यांना भजनाची आवड होती. ग्रामदैवत नागनाथ व विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा! सध्या उतारवयात त्यांचा दिवसातील बहुतांश वेळ नागनाथ मंदीरामध्येच जात असे. शेटफळच्या मातीशी एकरूप झालेल्या बाबुभाईचे वैयक्तिक आयुष्य मात्र फारच संघर्षमय व खडतर गेले.
लहानपणापासून दुसऱ्यांच्या शेतात गुरे राखण्याचे काम केले. नंतरच्या काळात दुसऱ्यांच्या शेतात मिळेल ती कामे करून उपजीविका चालवली. दगड फोडणे, गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करत नंतर दगडी बांधकाम करण्याची कामे त्यांनी केली. शेटफळमधील राम मंदीराचे दगडी बांधकामाचे तेच कारागीर होते. याकाळात त्यांनी भजनाचा छंदही जोपासला. इश्वर आणी अल्ला एकच आहेत आसे ते नेहमी म्हणायचे.
काही दिवसांपासून वयोमानानुसार त्यांना काम होत नव्हते. या काळात त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होत होती ही बाब गावातील जिव्हाळा ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यांना अनेक दिवस दररोज जेवनाचा डबा घरपोच पुरवण्याचे काम या ग्रुपने केले. गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरच गावात होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये बाबूभाईचा सहभाग असायचा. आयुष्यातील बराच वेळ त्यांनी भजन व ईश्वर चिंतनामध्ये घालवला आहे.
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी गावामधील नागनाथ मंदिरामध्ये होणाऱ्या एकादशीच्या कीर्तन कार्यक्रमाला नियमित हजेरी लावली. अशा या मुस्लिम भक्ताने अखेरचा श्वासही द्वादशी दिवशी त्याच नागनाथ मंदिरा समोर घेतला. ११ जानेवारी रोजी मंदिरासमोरच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.