करमाळा (सोलापूर) : मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध सुरू असतानाच करमाळा तालुक्यात मनात चीड निर्माण करणारा किळसवणा प्रकार समोर आला आहे. उन्हाळसुट्टीत घरी कोण नसल्याचा फायदा घेऊन 65 वर्षाच्या नराधाम चुलत आजोबाने अल्पवयीन नातीवर अत्याचार केला असून धक्कादायक बाब म्हणजे यात पीडित चिमुकली गर्भवती राहिली आहे. यामध्ये गुन्हा दाखल करून करमाळा पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
करमाळा तहसील कार्यालयासमोर आज (शुक्रवारी) महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मणिपूर येथे झालेल्या प्रकारचा निषेध करून प्रशासनाला संशयित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व असे अत्याचार पुन्हा होऊन नयेत म्हणून कठोर कायदे करावेत या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देऊन कार्यकर्ते तहसील कार्यालय परिसरातून जाताच एका चिमूरडीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने सर्वत्र चीड निर्माण झाली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करमाळा तालुक्यातील सबंधित पीडितेचे आई- वडील मोलमजुरी करतात. उन्हाळ सुट्टीत आई- वडील कामाला गेलेले असताना संशयित आरोपीने पिडीतीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. 500 रुपयांचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारादरम्यान पीडिता ओरडू लागल्याने त्याने तिला धमकी दिली. त्याने हा प्रकार वारंवार केला.
पीडितेला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला तिला कावीळ झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तिच्यावर उपचार सुरू असताना ती गर्भवती असल्याचे समोर आले. दरम्यान पिडीतीने सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यातून हा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर यांच्याकडे आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक संतोष देवकर व पोलिस कॉन्स्टेबल अनंत पवार उर्फ मेजर यांनी यशस्वी कामगिरी केली.