करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात आज (बुधवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पाटील यांच्याकडून चुकीचा उल्लेख झाला. हा उल्लेख चुकीचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच सारवासारव करत भ्रष्ठाचार निर्मूलनचा संदर्भ दिला.
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘पार्टीचा कार्यकर्ता भक्कम झाला पाहिजे. दुकानदारी करण्यासाठी कोणालाही पद दिले जाणार नाही. बेकायदा गुटखा विक्री, वाळू उपसा, दारू विक्री व्यवसाय चालत असतील आणि तुमच्याकडे माहिती असेल तर त्याचे व्हिडीओ शूटिंग करा, तत्काळ प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि माध्यमांना माहिती द्या. फक्त अधिकाऱ्यांना पत्र कशासाठी देता. बेकायदेशीर व्यवसाय चालत असेल तर त्याची शूटिंग काढा आणि प्रेस कॉन्फरन्स घ्या, त्यांची नावे द्या. पद ही दुकानदारी चालवण्यासाठी दिलेली नसतात. हेच करायचे असेल तर आरटीआयचा कार्यकर्ता व्हा, प्रहार किंवा इतर तसल्या संघटनेचा कार्यकर्ता व्हा.’
प्रहार संघटनेचा उल्लेख चुकीचा झाला आहे हे लक्षात येताच उमेश पाटील यांनी लगेच सारवासारव करत ‘बच्चू कडू यांची प्रहार संघटना चांगली आहे’. ‘भ्रष्टाचार निर्मूलन समिती काम करते त्याचे सदस्य व्हा. त्यातही काही लोक भ्रष्टाचार करतात. त्यातील अनेकजण चांगले काम करत आहेत. अण्णा हजारे यांचे खूप चांगले काम आहे. त्यांच्यामुळे चांगला कायदा तयार झाला. मात्र काहीजण गैरवापर करत दुकानदारी चालवत आहेत. हे कदापी सहन केले जाणार नाही’, असे ते म्हणाले.