सोलापूर (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणारा आणि करमाळ्यात होणाऱ्या केळी संशोधन केंद्राला कृषी विद्यापीठाने नकारात्मक अभिप्राय दिला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात होणारे हे केंद्र आता सोलापूर जिल्ह्यात कोठे होणार हे पहावे लागणार आहे.
करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे होणाऱ्या केळी संशोधन केंद्राबाबत माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मंडली. त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मंत्री मुंडे म्हणाले शेलगाव येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ५५ एकर जागा आहे. कोरडवाहू पीक संशोधनासाठी ही जागा आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाकडे अभिप्राय मागवण्यात आला होता. मात्र त्याला नकारात्मक अभिप्राय आला आहे. त्यामुळे तेथे हे केंद्र होणार नाही. सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी कोठे जागा उपलब्ध होईल तेथे केंद्र उभारले जाईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले आहे.
करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर तालुक्यात केळीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे सरकारच्या ५५ एकर जमिनीवर केळी संशोधन केंद्र काढले तर फायदा होईल. भारतातून निर्यात होणाऱ्या १६ हजार कंटेनर केळीपैकी सर्वाधिक केळी ही सोलापूर जिल्ह्यातून जात आहे. सुमारे ८ हजार कंटेनर केळी या जिल्ह्यातून जाते. त्यामुळे येथे केळी संशोधन होणे आवश्यक आहे, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, मोहोळ तालुक्यातही सरकारची जमीन आहे. शेलगाव येथील केंद्रात किती संशोधक आहेत, असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना मुंडे म्हणाले, केळी संशोधन केंद्राबाबत जे पत्र प्राप्त झाले आहे ते १६ जानेवारी २०२३ मध्ये झाले. त्यानंतर महाराष्ट्र कृषी शिक्षणक मंडळाने अभिप्राय घेण्यासाठी कृषी विद्यापीठाला पात्र दिले होते. शेलगाव येथील जागा कोरडवाहू पीक संशोधन केंद्राची आहे. १९४१ पासून कोरडवाहू पिकांवर संशोधन करण्यासाठी ही जागा घेतली होती. या केंद्राची आजही गरज आहे. त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठाने जागा नाकारली आहे.आमदार शिंदे यांनी केलेल्या मागणीचा विचार करून केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी दुसऱ्या जागेचा विचार केला जाईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले आहे.