करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे ‘महसुल सप्ताह’ अंतर्गत आधार कार्ड अपडेट, नवीन मतदार नोंदणी व मतदार जागृती कार्यक्रम झाला. यावेळी प्रांताधीकारी समाधान घुटुकडे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार शैलेश निकम, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, एल. बी. पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी घुटुकडे यांनी महसूलच्या कामकाजाची माहिती देत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील मुलं स्पर्धा परीक्षेकडे येतात मात्र शहरी भागातील मुलं याकडे येत नाहीत. स्पर्धा परीक्षेत स्वतः अभ्यास करावा लागतो, असेही ते म्हणाले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर कमी वेळेत जास्त मेहनत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रांताधिकारी घुटुकडे म्हणाले, सध्या महसूलची सर्व कामे अॉनलाईन होत आहेत. आपण ग्रामीण भागातील असल्याने आपल्या शेतातील पीकपाणी, सातबारा अशी सर्व कामे इप्रणालीचा वापर करुन करावा. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घेतला पाहिजे. लोकशाही सदृढ करण्यासाठी आपण मतदान केले पाहिजे. नवीन मतदारांनी मतदान नोंदणी करून मतदान करावे, असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी महसुलाचे अधिकारी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.