करमाळा (अशोक मुरूमकर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेन रोड व राशीन पेठमधील चार चाकी वाहनाच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून हा बदल करण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गणेशोत्सवामुळे करमाळा शहरातील मेन रोड, राशीन पेठ, दत्त पेठ, महाराष्ट्र चौक, वेताळ पेठ, तेली गल्ली, फुलसौदर चौक, संगम चौक आदी ठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणामुळे रस्त्यांच्या बाजूला खांब उभे करण्यात आले आहेत. त्यात समोरासमोर चारचाकी गाड्या आल्यातर वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी कामे सुरु आहेत त्याचाही परिणाम होत आहे. अशा स्थितीत दुचाकींनाही जाणे- येणे कठीण होत आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांची होती. हा प्रश्न पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी गांभीर्याने घेतला असून यावर वाहतूक कोंडीत बदल करण्यात आला आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी येतात. दुचाकीवर येणाऱ्या नागरिकांची रहदारी शहरात मोठी असते. मात्र समोरासमोर दोन चारचाकी आल्यातर त्यातून कोंडी तयार होते. अनेकदा त्यातून वादही होतात. शहरात शाळांमध्ये येणाऱ्यांचीही वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होते. यावर हा उपाय असल्याचे बोलले जात आहे. आवश्यकतेनुसार यात बदल करावा, अशी भावना नागरिकांची आहे.
असा आहे बदल
करमाळा शहरात मेन रोडवर चारचाकी वाहने येऊ नयेत म्हणून संगम चौक व फुलसौदर चौक येथे बॅरेकेटींग करण्यात आले आहे. तर राशीन पेठमध्ये चारचाकी वाहने येऊ नयेत म्हणून गुगळे यांच्या दुकानाजवळ तर दत्त पेठमध्ये चारचाकी वाहने येऊ नयेत म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे बॅरेकेटींग करण्यात आले आहे. गणेशोत्सवामुळे हे बॅरेकेटींग करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. गैरसोय होऊ नये म्हणून मालवाहतूक गाडयांना वेळ ठरवून देण्यात येईल. वाहतूक पोलिस विभागातील वैभव राऊत, मयूर कदम व दीपक कांबळे हे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी परिश्रम घेत आहेत.
- सचिन हिमगिरे, वाहतूक पोलिस अंमलदार, करमाळा
निर्णयाचे स्वागत
करमाळा शहरात चारचाकी गाड्या आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा चारचाकी गाड्या आल्यानंतर ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. याचा परिणाम व्यापाऱ्यांवर होत आहे. दुचाकींना मात्र परवानगी दिली पाहिजे. करमाळा शहरात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे चारचाकी गाड्या पेठेत उभा करता येत नाहीत. दुचाकीवर आलेला ग्राहक जास्तवेळ थांबत नाही. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत नाही. मात्र चारचाकी गाड्या आल्या तर परिणाम होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चारचाकीबाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- रितेश कटारिया, व्यापारी
एकेरी वाहतूक आवश्यक
करमाळा शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा अनावश्यकपणे चारचाकी गाड्या पेठेत घुसतात त्याचा परिणाम सर्वांवर होतो. नगर, पुणेप्रमाणे करमाळ्यात एकेरी वाहतूक करणे आवश्यक आहे. यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलिस निरीक्षक परशुराम कोकणे यांच्याशी आमची चर्चा देखील झाली होती. व्यापाऱ्यांना माल देण्यासाठी एक वाहन वाहन सोडण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. पोलिसांचे व्यापाऱ्यांना नेहमीच सहकार्य राहिलेले आहे. चारचाकी वाहने आली नाही तर वाहतूकही सुरळीत होत आहे.
- संतोषशेठ गुगळे, व्यापारी
करमाळा शहरात आज चारचाकी वाहनांना परवानगी दिली नाही. त्याचा परिणाम दिसला. नागरिकांना खरेदीसाठी कोणतीही अडचण आली नाही. चारचाकी वाहने आल्यानंतर अडथळा होत आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. एमर्जन्सी वाहने सोडण्यासाठी मात्र परवानगी देणे आवश्यक आहे. शहरात रुग्णालये आहेत तेथे रुग्णवाहिका व इतर महत्वाची चारचाकी वाहने सोडावीत.
- शिवराज चिवटे, व्यापारी
करमाळा शहरात मेन रोडवर वाहतूक कोंडीमुळे महिलांना व वृद्धांना वाहतूक कोंडीतून चालताही येत नाही. वाहन चालकांना शिस्त लागणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांना माल देणाऱ्या मालवाहतुकीसाठी वेळ ठरवून देणे आवश्यक आहे. त्यांचीही गैरसोय होणार नाही याचा विचार होणे आवश्यक आहे. मात्र वाहतूक कोंडीसाठी पोलिसांनी बॅरेकेटींग करून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. त्याचा चांगलाच परिणाम दिसणार आहे.
- सचिन घोलप, माजी नगरसेवक