करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. याची प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यंत्रणा सज्ज झाली आहे. याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत दिली आहे.

करमाळा नगरपालिका क वर्ग दर्जाची आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुलाचे तहसीलदार दिनेश पारगे हे असणार आहेत. नगराध्यक्ष व २० नगरसेवकांसाठी १० प्रभागातून ही निवडणूक होणार असून त्यासाठी २२ हजार ११६ मतदार असणार आहेत. त्यात ११ हजार ६६ महिला, ११ हजार ४८ पुरुष व इतर २ मतदारांचा समावेश आहे. २७ मतदान केंद्रावर ही निवडणूक होणार आहे.
नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी ७ लाख ५० हजार व नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्यासाठी २ लाख ५० हजार खर्चाची मर्यादा असणार आहे. निवडणूक लढवणाराचे २१ वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक असणार आहे. अपक्ष उमेदवारासाठी ५ व पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्यासाठी १ सूचक लागणार आहे. सर्वसाधारण उमेदवाराला १ हजार, महिला व राखीव जागेवरील उमेदवाराला ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. राखीव जागेसाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
नगरपालिका कार्यालयाशेजारील श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथे शासकीय सुट्टी वगळता १० ते १७ नोव्हेंबर या दिवशी अर्ज दाखल करता येणार आहेत. १८ तारखेला छाननी होणार असून अपील नसेल तेथे २१ व अपील असल्यास २५ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. २६ तारखेला चिन्ह वाटप होणार असून २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर ३ तारखेला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे मतमोजणी होणार आहे, अशी माहिती तपसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
