महिला दिनानिमीत्त ‘सीईओं’च्या हस्ते करमाळा तालुक्यातील पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीसचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार’ वितरण झाले. यामध्ये करमाळा तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या सात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल व समाजातील माता- बालकांच्या आरोग्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा बहुमान प्रदान करण्यात आला ‘आदर्श पर्यवेक्षिका’ म्हणून सुजाता कांबळे (वरकुटे २), ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ म्हणून सुकेशिनी काळे (सावडी शिरोमणी मळा), योगिता शिंदे (पोथरे शिंदे वस्ती) व केशर शिंदे (केडगाव धनवट वस्ती), ‘आदर्श अंगणवाडी मदतनीस’ म्हणून सुरेखा आवटे (देवळाली २), शिरीन शेख (गुळसडी भंडारे वस्ती) व सुवर्णा जाधव (धायखिंडी) यांना सन्मानित करण्यात आले.

अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलन, लसीकरण, पूर्व प्राथमिक शिक्षण आणि शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या सेविकांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी करमाळा तालुक्यातील सात महिलांना जिल्हास्तरावर गौरवण्यात आल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही नवीन ऊर्जा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *