‘रिटेवाडी’ योजनेबाबत मुंबईत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत दीडतास बैठक

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारा रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात आज (मंगळवार) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात बैठक घेतली. साधारण दीडतास चाललेल्या या बैठकीत WAPCOS च्या सर्वेनुसार सबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल देत सकारात्मक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार नारायण पाटील, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, प्रा. रामदास झोळ, रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीचे सरपंच अंकुश शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीबाबत माहिती देताना भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा बागल म्हणाल्या, ‘सरकार या योजनेबाबत सकारात्मक आहे. ही योजना मार्गी लागण्याच्या वाटेवरील हे महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेचा फायदा तालुक्यातील ४० गावांना होणार आहे. कुकडीचे पाणी करमाळा तालुक्याला पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी टेल टू हेड या क्रमाने पाणी दिले जाईल. त्याचबरोबर अस्तरीकरणाचे काम देखील केले जाईल असे या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी सांगितल्याचे’ बागल यांनी सांगितले.

कुकडीचे पाणी, जलसंपदा मंत्री अन दिगंबरराव बागल यांची आठवण!
कुकडीच्या योजनेसंदर्भात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांनी आपल्याकडे आग्रह केला असता स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आदेश दिले व सदरील योजना मार्गी लागली, असा आवर्जून उल्लेख विखे पाटील यांनी केला, असे यावेळी सांगण्यात आले.

प्रा. झोळ म्हणाले, ‘रिटेवाडी उपसासिंचन योजना ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. ही योजना भाजप सरकारच मार्गी लावू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या योजनेसाठी सकारात्मक आहेत. मंत्री विखे पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत संपुर्ण माहिती घेतली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल. लवकरच ही योजना मार्गी लागेल असा विश्वास आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *