करमाळा (सोलापुर) : मराठा आरक्षणासाठी करमाळा शहरात एकाने आत्महत्या केली आहे. बलभीम विष्णू राखुंडे (वय ८०, रा. कानाड गल्ली, करमाळा)असे त्यांचे नाव आहे. आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी एक चिठ्ठी लिहून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती समजताच करमाळा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशीवाय करमाळा येथील मराठा समाजबांधव देखील एकत्र आले आहेत.
आत्महत्या केलेले राखुंडे हे मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात सहभागी होते. करमाळ्यात झालेले साखळी उपोषण, मुक मोर्चे, मुंबईत निघालेला मोर्चा यामध्ये त्यांचा सहभाग होता. नुकत्याच झालेल्या सोलापुरातील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीतही त्यांची मुलं सहभागी झाली होती.
‘मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही. मराठा आरक्षण मिळावे यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देत आहे’, असे या चिठ्ठीत म्हणत खाली सही केली आहे. याचा तपास करमाळा पोलिसांकडून सुरु आहे. राखुंडे यांचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे आणला असून पुढील प्रक्रीया सुरु आहे.