करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्ता व पैशासाठी नाही तर शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगारनिर्मितीसाठी ’भूमिपुत्र’ म्हणून मला एक वेळ विधानसभेत पाठवून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे. वाशिंबे येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, काँग्रेसचे हरिभाऊ मंगवडे, गफूर शेख, आनंद झोळ, संभाजी शिंदे, मधुकर झोळ, अनुरथ झोळ, पांडुरंग झोळ, लालासाहेब जगताप, माया झोळ, शिवाजी पाटील, रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, सुदर्शन शेळके, यशवंतराव गायकवाड, सत्यवान गायकवाड, सुहास काळे पाटील, भगवान डोंबाळे, कल्याण खाटमोडे, श्रीकांत साखरे पाटील उपस्थित होते.
प्रा. रामदास झोळ म्हणाले, ‘रस्ते, वीज, पाणी ही कामे लोकप्रतिनिधीला करावीच लागतात. परंतु शिक्षण, आरोग्य, रोजगार हे प्रश्न मार्गी लावणे लोकप्रतिनिधीचे काम असते. करमाळा तालुक्यातील गावांमधील रस्ते, पाण्याबाबत प्रश्न वर्षानुवर्ष तसाच आहे. तो प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच शिक्षण व रोजगार निर्मितीसाठी देवळाली येथे शिक्षण संकुलाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करणार आहे. याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी भव्य नोकरी महोत्सवाच्या आयोजन करून युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देण्याबरोबरच मकाई, कमलाई, भैरवनाथ या कारखान्याकडे अडकलेली ३० कोटीची बिले आंदोलन करून आम्ही मिळवून दिली आहेत. शेतकऱ्यांच्या खिशाला एक रुपयाची झळ न लागू देता स्वतः न्यायालयीन लढून न्याय मिळून दिला आहे. म्हैसगाव येथील विठ्ठल शुगर्स कारखाना दुसऱ्या कंपनीला चालवण्यास दिला असून या कारखान्याकडे अडकलेली बिले सभासद रक्कम मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून १०० कोटी देण्यास भाग पाडले आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या माध्यमातून सर्व घटकांना, बहुजन बांधवांना न्याय देण्यासाठी आपण पाठपुरावा करून मुलींचे शिक्षण मोफत करण्याबरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांनाही इतर समाजाप्रमाणे वस्तीगृह भत्ता मिळून दिला आहे. धनगर समाजालाही एसटी आरक्षणाप्रमाणे सर्व लाभ मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून मागणी केली, असे ते म्हणाले.