सोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. 4) होणार आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व घाऊक मद्यविक्री, सर्व किरकोळ मद्यविक्री व ताडी विक्री अनुज्ञप्त्या मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत आणि निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवण्याबाबतचे सुधारित आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.

लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी याकरिता जिल्हयातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री दुकाने, ताडी विक्री दुकाने 5 ते 7 मे रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंद ठेवणेबाबत तसेच मतमोजणी निमित्त 4 जुनला पूर्ण दिवस बंद ठेवणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते. सदर आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री मनाईबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत.

सर्व मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक व ताडी विक्री अनुज्ञप्तीधारक यांनी सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदयातील तरतूदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.