करमाळा (सोलापूर) : राज्यात गोवंशाला प्रतिदिनी १०० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केंद्रीय मंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांच्याकडे केली आहे. मंत्री सिंह यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे बन्सी गिर गौशाळा (गोतीर्थ विद्यापीठ) येथे ‘प्राणी आणि पर्यावरणातील बदल’ याबाबत आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाले. याला सुपनवर हे उपस्थित होते. तेव्हा त्यांनी ही मागणी केली केली आहे.
गिरीश शहा आणि समस्त महाजन समाजाने ही चर्चासत्र घेतले. या परिसंवादात प्राणी कल्याण आणि पर्यावरण संरक्षण यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि विविध गोशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पशुसंरक्षण क्षेत्रात होत असलेल्या प्रयत्नांचे मंत्री सिंह यांनी कौतुक केले. राज्यसभेचे खासदार बाबूभाई देसाई हे यावेळी उपस्थित होते. ‘गो- संस्कृती’ या पुस्तकाचे लोकार्पणही कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.
सुपनवर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडत गोवंश यांना प्रतिदिनी १०० रुपये अनुदान देण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्यातील धनगर मेंढपाळावर होणारे हल्ले, वन विभागाकडून मेंढपाळावर होणारे गुन्हे व सक्तीने होत असलेल्या दंड वसुलीबाबत लक्ष घालण्याची मागणी केली. जंगली प्राण्यांकडून होणारे हल्ले व स्वरक्षणासाठी बंदूक परवाना देण्यात यावा, धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.