करमाळा (अशोक मुरूमकर) : अनेकांना जीव गमवावा लागलेल्या बहुचर्चित जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गासाठी निधी उपलब्ध असूनही अद्याप काम सुरु झालेले नाही. या मार्गाचे काम कधी सुरु होणार असे नागरिक विचारू लागले आहेत. निधी उपलब्ध होऊन देखील का काम सुरु झालेले नाही? यामध्ये नेमका कोणाचा हस्तक्षेप होत आहे? असे प्रश्न नागरिकांमधून केले जात आहेत.
२०१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंभुर्णी ते जातेगाव या महामार्गाच्या ६१ किलोमीटरच्या या कामाचा ३२९.९८ कोटींचा कार्यारंभ आदेश एका कंपनीला दिला होता. मात्र भूसंपादनाचा वाद निर्माण झाल्याने २०१४ मध्ये संबंधित कंपनीने हे काम बंद केले होते. दरम्यान या रस्त्याचा वाद न्यायालयात गेला होता. या मार्गाचे काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण होणे आवश्यक होते. त्यासाठी पाठपुरावा करून माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सरकारकडून एनओसी मिळवली आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये यासाठी १२३४ कोटी १२ लाख निधीही मिळवला. काम सुरु करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रियाही सुरु झाली. मात्र अजूनही हे काम झाले नाही. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडेही अनेकांनी त्यांच्या काळात तक्रारी केल्या होत्या. याबाबत बैठक देखील घेतली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक झाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही या महामार्गाच्या कामाबाबत करमाळ्यात अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेतली होती. तेव्हा आमदार नारायण पाटील हे देखील उपस्थित होते. मात्र अजूनही हे काम सुरु झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या महामार्गावरून सतत अपघात होत आहेत. याकडे गांभीर्याने पहाण्याची गरज आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मत
करमाळा सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे हस्तांतर झाले आहे. हे काम करण्याची आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची जबाबदारी आहे. आमच्याकडील सर्व प्रक्रिया झालेली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मत
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता स्वप्नील तोडकर म्हणाले, ‘जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे काम सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे. काम सुरु करण्यासाठी एजन्सी नेमलेली आहे. मात्र काही ठिकाणी मूल्यांकन लवकर प्राप्त झाले नव्हते. अतिवृष्टी व पूर याच कारण संबंधित विभागाकडून देण्यात येत होते. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही स्वतः प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत. लवकरच प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरु होईल.
कार्यालयाला सुट्टी असल्याने माहिती नाही
उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड म्हणाल्या, ‘कामाबाबत सोमवारी माहिती दिली जाईल. आज सुट्टी असल्याने कार्यालयात कोण नाही. किंवा बुधवारी करमाळ्यात आल्यानंतर सर्व माहिती दिली जाईल.
काम सुरु होणे आवश्यक
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हा सरचिटणीस संतोष वारे म्हणाले, ‘जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गासाठी आम्ही नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. यासाठी आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेही प्रयत्न आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहाण्याची गरज आहे. या मार्गावर सतत अपघात अनेकांचे प्राण जात आहेत.’
