करमाळा (सोलापूर) : अवकाळीने नुकसान झालेल्या केळीसह फळबागांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना एकरी दिड लाख मदत मिळावी, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले आहे.
माजी आमदार पाटील म्हणाले, अवकाळी पावसाचा केळी व फळबागांना तडाखा बसला आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने व वादळाने नूकसान झालेल्या भागात करमाळा तालुक्यातील भाग हा सर्वाधिक आणि प्राधान्याने येतो. यामुळे प्रशासनाने एक विशेष भाग म्हणून याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली असती तर प्रशासनाकडूनची पुढील पाऊले अधिक गतिने पडली असती. आता किमान नुकसान झालेल्या पिकांचे आणि फळबागांचा अहवाल तातडीने तयार करुन एकरी दिड लाखची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. यंदाचा केळी व फळबाग उत्पादनाचा खर्च हा मागील वर्षाच्या तुलनेत जादा झालेला आहे. उजनीची पाणी पातळी कमी झाल्याने प्रत्यक्ष पाणी पातळी पर्यंत चारी खोदकाम, वीजेचे पोल व केबल आदी खर्चाचा भार उत्पादन खर्चावर पडलेला आहे.
सरकारने ही बाब प्राधान्याने लक्षात घेऊनच नुकसान भरपाई अहवाल तयार करावा. जुनमध्ये शैक्षणिक वर्षास सुरुवात होत असल्याने मुलांची शैक्षणिक फि आदिचा खर्च शेतकऱ्यांना करावा तर लागणार आहे, परंतू नवीन पिकाची लागणसुध्दा नव्या जोमाने करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. सरकारने या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर मात्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनाही अहवाल देणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.