करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना स्वतः च्याच ताब्यात घ्यायचा आहे, त्यासाठीच ते आदिनाथ कारखाना जास्तीत जास्त कसा अडचणीत येईल याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोप बारामती एॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केला आहे. (Photograph of Sawant mounted on Adinath Factory Baramati agro deputy chairman Subhash Gulve)
बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे म्हणाले, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती एॅग्रोला भाडेतत्त्वावर घेतलेला असताना जाणीवपूर्वक याच्यात राजकारण करून हा कारखाना बारामती ऍग्रोला देण्यास विरोध केला. आज आदिनाथ कारखाना किती क्षमतेने चालतो हे मी सांगण्याची गरज नाही. आदिनाथ कारखाना वाचवायचा असेल तर सावंतांनी स्वतःच्या कारखान्याची यंत्रणा आदिनाथ कारखान्याला पुरवली पाहिजे. मात्र असे न करता स्वतःच्याच कारखान्यांना ऊस मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. कारखानदारीत सावंत यांची विश्वासहर्ता संपत चाललेले असून मंञी सावंत यांचा कोणताही कारखाना मोठे गाळप करू शकणार नाही.
सावंतांनी आदिनाथ वरती प्रशासक आणून प्रशासकांना आपल्या इशारा वरती नाचवण्याचे काम करत आहेत. प्रशासक म्हणून नेमण्यात आलेले शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे कारखाना सावंतांच्या घशात कसा घालता येईल? यासाठी ते सर्व वातावरण निर्मिती करत आहेत. यावर्षी आदिनाथला यंत्रणा पुरवावी म्हणून प्रशासक नेमलेले पवारांच्या दारात फेऱ्या मारत आहेत. आदिनाथची एवढीच काळजी आरोग्य मंत्री सावंतांना असेल तर त्यांनी त्यांच्या कारखान्यातून यंत्रणा पुरवली तरी देखील हा कारखाना चालू शकतो. मात्र ह्यांना कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालवायचा नसून कारखान्याचे वाटोळे करून हा कारखाना स्वतःच्या ताब्यात कसा मिळेल याची रचना आखण्याचे काम सुरू आहे
कारखानावर सावंताचे फोटो कशासाठी?
आदिनाथ कारखाना हा शेतकऱ्यांचा राहिला पाहिजेत सभासदांचा राहिला पाहिजे असं म्हणत असताना सावंतांचे फोटो कारखान्याच्या कार्यालयात कशासाठी लावले आहेत. याचे उत्तर द्यावे. आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोला आदिनाथ देण्यासाठी विरोध करणाऱ्यांनी सावंत यांचे कारखाने किती क्षमतेने चालतात आणि त्यांनी किती भाव आतापर्यंत शेतकऱ्यांना दिला हेही एकदा सावंतांना विचारून घ्यावे. बारामती ॲग्रो कारखान्याने जामखेड तालुक्यातील हळगाव येथील श्रीराम शुगर कारखाना घेतला असून जामखेड, कर्जत व करमाळा तालुक्यातील उसाचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. याशिवाय शेतक-यांना 2900 रूपये भाव दिला आहे.