करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. सोमनाथ दिलीप काळे (वय २३, रा. थेरगाव, ता. कर्जत, जि. नगर) असे संशयित गुन्हेगाराचे नाव असून त्याने दोन चोऱ्या केल्याचा संशय आहे. १ लाख ९५ हजाराचे दागिने चोरल्याचे त्याने कबूल केले आहे. त्याचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
करमाळा एसटी स्टॅण्डवर २२ नोव्हेंबरला आळजापूर येथील शीतल बिभीषण रोडे (वय ३५) यांचा दोन तोळ्याचा सोन्याचा गंठण, नऊ ग्रॅमचे नेकलेस, नऊ ग्रॅमचे फुले- झुबे व ८ ग्रॅमची सोन्याची चैन चोरीला गेली होती. तर २४ नोव्हेंबरला सोलापुरातील छाया बंडेश पांढरे (वय ७०) यांचा करमाळा ते कुर्डुवाडी दरम्यान प्रवास १५ ग्रॅम सोन्याची पाटली चोरीला गेली होती. या दोन्ही घटनेत करमाळा पोलिसात अनोळखी चोरट्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. याचा तपास करमाळा पोलिस करत होते.
करमाळा पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने याचा वेगाने तपास केला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु होता. दरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत असताना संशयित गुन्हेगार काळे याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलिस नाईक वैभव ठेंगल, मनीष पवार, पोलिस कॉन्स्टेबल तौफिक काझी, ज्ञानेश्वर घोंगडे, गणेश शिंदे, रविराज गटकुळ, सोमनाथ जगताप यांच्यासह सायबर पोलिस ठाणेकडील पोलिस नाईक व्यंकटेश मोरे यांनी यामध्ये महत्वाची कामगिरी केली असल्याचे पोलिस निरीक्षक घुगे यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
प्रवासा दरम्यान व गर्दीत नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांनी मौल्यवान दागिने व्यवस्थित ठेऊन प्रवास करावा. चोरीच्या घटना घडू नयेत त्यावर नियंत्रण रहावे म्हणून करमाळा स्टॅण्डवर कायम पोलिसांचे लक्ष आहे. येथे सीसीटीव्ही वाढवावेत म्हणून आगार प्रमुखांना सूचना केल्या आहेत.
- विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, करमाळा