करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ व मकाई हे दोन्ही सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या दोन्ही कारखान्याच्या संदर्भात दोन दिवसात दोन महत्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. या घडामोडीत बागल आणि चिवटे यांची सरशी ठरली आहे. मकाईच्याबाबतीत बागल गटाला दिलासा मिळालेला आहे. आदिनाथच्याबाबत चिवटे यांना गिफ्ट मिळाले आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये अर्ज मागे घेण्याचा उद्या (सोमवारी) शेवटचा दिवस आहे. मात्र त्यापूर्वीच सोलापूर सहप्रादेशिक संचालक (साखर) यांनी निकाल देऊन मकाई सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी दिलेला निकाल कायम ठेवत बागल विरोधी गटाचे अर्ज अपात्रच ठरवले आहेत. बागल गटाला हा मोठा दिलासा आहे. अर्ज मागे घेण्याची दिवशी विरोधी गटाचे अर्ज राहणार का काढले जाणार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी आहे या स्थितीत कारखाना बागल गटाच्याच हातात राहील हे स्पष्ट झालेले आहे. याबाबतचा निकाल शनिवारी रात्री समजला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आदिनाथ कारखान्यावर अशासकीय सदस्यांची निवड झाल्याचे समोर आले आहे. त्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचे नाव आहे. म्हणजे हे त्यांना एकप्रकारे गिफ्टच मानले जात आहे.
चिवटे हे आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून आदिनाथ सहकारी तत्वरच रहावा म्हणून भूमिका मांडत होते. याबाबत त्यांनी लढाही उभारला होता. करमाळा येथील एका रुग्णालयाच्या उदघाटनावेळी एकत्र आलेल्या मंडळींसमोर चर्चा करताना अगदी सहजपणे त्यांनी आदिनाथचा विषय मांडला होता. त्यातून आमदार रोहित पवार यांच्याकडे जाणारा हा कारखाना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये अनेक नेत्यांचे व कार्यर्कत्यांचे सहकार्य आहे. मात्र दरम्यानच्या काळात यामध्ये अनेक घडामोडी झाल्या होत्या. या कारखान्याची निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र वेळेत पैसे न भरल्याचा ठपका ठेवत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आला. त्यानंतर साधणार सव्वा महिन्यातच प्रशासक मंडळ तयार करण्यात आले. त्यात चिवटे व संजय गुटाळ यांची वर्णी लागली आहे.