करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) संभाव्य उमेदवार माण येथील अभयसिंग जगताप यांनी माढा मतदार संघासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. करमाळ्यात क्रिकेट स्पर्धेनंतर त्यांची मकरसंक्रातीच्या निमित्ताने महिलांसाठी भव्य खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला आहे. हा कार्यक्रम सलग दोन दिवस आहे. याला प्रतिसादही चांगला मिळाला हे खरं आहे पण यातून अभयदादा यांची उमेदवारीसाठी एकांकी मोर्चेबांधणी सुरु आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरे गट व काँग्रेसही आहे. मात्र करमाळ्यात या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, गोवर्धन चवरे, महिला आघाडीच्या नलिनी जाधव, राजश्री कांबळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संतोष वारे यांच्यासह अरुणकाका जगताप व सतीश फंड आदीजण कार्यक्रमस्थळी दिसले. ठाकरे गटाचे प्रवीण कटारिया, शंभूराजे फरतडे, सुधाकर लावंड, संजय शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्य प्रतापराव जगताप हे कार्यक्रमात शेवटपर्यंत दिसले नाहीत.
कार्यक्रम संपेपर्यंत अभयसिंग जगताप, वारे, चौरे व जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जगताप यांना भेटण्यासाठी अनेक महिलांनी गर्दी केली होती. सुरुवातीला ते एकटेच मंचावर होते. थेट महिला त्यांच्याशी सवांद साधत होत्या. काही वेळानंतर जाधव आणि वारे मंचावर आले. आणि दुसऱ्यादिवशी कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले. घटक पक्षातील पदाधिकारी कोणीही न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
ठाकरे गटाचे प्रवीण कटारिया ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना म्हणाले, ‘महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला आम्ही विजयी करू. अभयसिंग जगताप व आमच्यात योग्य समनव्य आहे. महिलांचा कार्यक्रम असल्याने आम्ही कालच्या कार्यक्रमात पूर्णवेळ थांबलो नाहीत. शाहूदादा फरतडे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला भेट दिली होती. आज होणाऱ्या बक्षीस वितरणावेळी आम्ही उपस्थित राहणार आहोत.’
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे म्हणाले, ‘मकरसंक्रातीनिमित्त महिलांसाठी घेतलेल्या कार्यक्रमाचे अतिश कमी वेळात नियोजन केले. त्यात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगताप हे नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर होते. शिवाय ठाकरे गटाचे पदाधिकारी अभयसिंग जगताप यांना भेटून गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये व्यवस्थित समन्वय आहे. अभयसिंग जगताप यांना विजयी करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावत आहोत.’
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप म्हणाले, ‘महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्यांना आम्ही विजयी करणार आहोत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आमचे काम सुरु आहे. नियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर गावी आहे. मात्र अभयसिंग जगताप यांचा काल आमच्या निवासस्थानी सत्कार झाला. आमचे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी होते.’