करमाळा (अशोक मुरूमकर) : होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकारण तापू लागलेलं असतानाच करमाळ्याच्या राजकारणात एकमेकांचे पारंपारिक विरोधक असेलेले आमदार नारायण पाटील व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर दिसले. विशेष म्हणजे यावेळी किंगमेकर म्हणून ज्यांना ओळखले जाते ते विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व पाटील गटाचे विश्वासू ‘आदिनाथ’चे संचालक देवानंद बागल यावेळी उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
संबंधित कार्यक्रमाला करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, आदिनाथचे संचालक ऍड. राहुल सावंत, महादेव फंड आदी उपस्थित होते. कार्यक्रम पत्रिकेत माजी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेही नाव होते.

करमाळा नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तालुक्याच्या राजकारणात आमदार पाटील यांचा पाटील गट, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे गट, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांचा बागल गट व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट यांच्या भूमिका महत्वाच्या असतात. विधानसभा निवडणुक पाटील, शिंदे व बागल यांच्यात तिरंगी झाली होती. (प्रा. रामदास झोळ यांच्यासह बाकीच्या उमेदवारांना मते कमी होती.) जगताप गटाने पाटील यांना पाठिंबा होता. तर शिंदे व बागल विरोधात होते.

करमाळ्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत जगताप तटस्थ होते. तर पाटील व शिंदे यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली होती. बागल यांनी माघार घेत शेवटच्या दिवशी पाटील यांच्या दृष्टीने सोईचा निर्णय घेतला होता. आता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत बागल काय निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना पाटील व बागल एकाच मंचावर दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर बागल हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे व बागल यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरु असल्याचे दिसत आहे. विद्या विकास मंडळाचे सचिव घुमरे हे बागल गटाचे मार्गदर्शक आहेत. त्यांचा करमाळ्याच्या राजकारणाचा मोठा अभ्यास आहे. २०१९ मध्ये संजयमामा शिंदे हे विधानसभेत पाटील यांचा पराभव करून विजयी झाले होते. तेव्हापासून पाटील यांना विजयी करण्यासाठी पडद्यामागून एक व्यक्ती रणनीती आखत होती. त्या व्यक्तीचा आणि घुमरे यांचा खूप चांगला संबंध आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आदिनाथमध्ये पाटील गट विजयी कसा होईल यासाठीही त्याच व्यक्तीने पडद्यामागुन सूत्र हलवली होती, अशी विश्वसनीय माहिती आहे. आता येणाऱ्या निवडणुकीतही शिंदे यांना रोखण्यासाठी शिंदे व बागल हे एकत्र आणले जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे.
करमाळ्यात नगरपालिका निवडणुकीत जगताप गटाचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत बागल व जगताप एकत्र होते. आता शिवसेनेचे महेश चिवटे यांच्या माध्यमातून जगताप हे शिवसेनेत गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीक असलेले माजी आमदार शिंदे यांच्या गटाची या निवडणुकीत काय भूमिका असेल हे अद्याप स्पष्ट नाही. नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची समीकरणे कशी जुळतील हे पहावे लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर बागल व पाटील एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
देवानंद बागल हे पाटील गटाचे विश्वासू आहेत. पाटील यांच्यात विजयात त्यांचाही महत्वाचा रोल आहे. बागल म्हणाले, ‘संबंधित कार्यक्रम राजकीय नव्हता. त्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व गटाच्या नेत्यांना निमंत्रित केले होते. प्रोटोकॉलनुसार आमदार पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख होते. याकडे राजकीय दृष्ट्या पाहू नये.’
