करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट कामामुळे कृष्णाजी नगर भागात दोन ठिकाणी गटारीचे बांधकाम करूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कृष्णाजीनगरच्या प्रवेशद्वारात (येडा आई मंदिरासमोर) काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बांधकाम केले होते. त्या रस्त्याच्या खालील गटारीच्या पाईपामधून एसटी कॉलनी पासूनचे घाण पाणी जाते.
दोन वेळा नवीन पाईप टाकून हे बांधकाम केले होते. तरी त्यातून घाण पाणी बाहेर येत आहे. तेथून काही अंतरावर काही दिवसांपूर्वी रस्त्यावर खड्डा पडला होता. त्यातूनही गटारीचे घाण पाणी येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जा- ये करणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. त्या रस्त्याने विद्यार्थ्यांची ये- असते. नागरिकांनी नगरपालिकेत तक्रार केल्यानंतर तेथे रस्त्याच्या खाली गटारीचे नवीन पाईप टाकून रस्ता व्यवस्थित केला होता. मात्र ते काम निकृष्ट झाले आहे. 3- 4 दिवसात त्या रस्त्यात पुन्हा खड्डे झाले आहेत. या दोन्ही कामाची तपासणी करून नगरपालिकेने येथील नागरिकांचा विचार करून लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी नागरिकांची आहे.