सोलापूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 13 हजार 563 इतकी असून या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी राहुल गायकवाड, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तसेच पूर्वीचे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ व अन्य सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यापैकी 25 हजार 71 शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम आदा झालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम सरकार निर्णयात नमूद तरतुदीच्या अधीन राहून जेवढ्या शेतकऱ्यांचे शक्य आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. विमा कंपनीने बऱ्याच ठिकाणी पीक नुकसानीचा पंचनामा न करता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे नाकारलेले आहेत हे चुकीचे असून विमा कंपनीने नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, असे त्यांनी निर्देशित केले.
कृषी विभागाने पिक विमा कंपनीच्या अहवालाची व्यवस्थित माहिती घेऊन आजच्या बैठकीच्या संदर्भ देऊन ज्या शेतकऱ्यांना या अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अहवाल विमा कंपनीला पाठवावा व विमा कंपनीने त्यांच्या स्तरावरून याबाबत पुढील कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल यासाठी सकारात्मक रहावे असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 नुकसान भरपाईची सद्यस्थिती बैठकीत मांडली. यामध्ये हंगाम मध्य प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई वाटप हे जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार 750 शेतकऱ्यांना 115 कोटी झालेले असून 13 हजार 533 शेतकऱ्यांना 93 लाख रुपये मिळणे बाकी असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक पंचनामे आधारित नुकसान भरपाई 25 हजार 954 शेतकऱ्यांची झालेली होती यानुसार 24 हजार 772 शेतकऱ्यांना 24 कोटी 33 लाखाचे वाटप झाले. त्याप्रमाणेच काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत 21 हजार 384 पूर्व सूचना पैकी 14 हजार, 454 पंचनामे पूर्ण झाली असून त्यापैकी 3313 शेतकऱ्यांना आज अखेर एक कोटी 96 लाखाचा निधी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.