डॉ. प्रदीप बुवासाहेब जाधव पाटील तथा डॉक्टर आबा गेल्याची बातमी अक्षरशः वीज कोसळल्या सारखी कानावर कोसळली अन कान, मन, मन सुन्न- बधिर झालं! आबा, वय होतं का हो तुमचं जाण्याचं… का आणि कशासाठी असे अकाली गेलात? या प्रश्नाने आणि तुमच्या जाण्यानं माझ्यासारख्या कैक जणांच्या मनात जी पोकळी, जे रितेपण आणि पोरकेपण निर्माण झालंय, त्याचा विचार का नाही हो केला असे अचानक जाताना तुम्ही? आबा, माझं नी तुमचं नातं तर माझ्या दृष्टीनं शब्दातीत होतं. तुम्ही कुठंही, कधीही भेटलात तरी मी तुमचे चरणस्पर्श करून तुमचा आशीर्वाद घ्यायचो. आबा, तुम्ही खरोखरच मला थोरला भाऊ होऊन जे प्रेम, जी माया, जो आधार दिलात ते मी शब्दात बद्धच करू शकत नाही.
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांच्याबाबत व्यक्त केलेल्या भावना…
करमाळा तालुक्यातील तरटगाव हे गाव व ही ग्रामीण शेतकरी कुटुंबाची सामान्य पण खानदानी मराठा अशी पार्श्वभूमी असलेल्या आबांचे वडील बी. एम. पाटील हे इथल्या महात्मा गांधी विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून त्या काळी रुजू झाल्याने आबा व त्यांच्या बहीण- भावासह कुटुंब आमच्या लहानपणी कुंकू गल्लीत एका भाड्याच्या घरात रहायचे. आबा व माझा दोन नंबरचा मोठा भाऊ कै. ऍड. संजयबापू हे हायस्कुलमधले वर्गमित्र नी नातंगोतं यामुळं आमचं एकमेकांच्या घरी सतत जाणं- येणं असायचं आणि लहानपणी मी देखील मोठया भावाचा मित्र म्हणून आबाला अरेतुरेच बोलायचो.
आबा बहीण-भावांमध्ये थोरले.त्या काळात प्रतिकूल आर्थिक परिस्थितीला तोंड देत सरांनी आबाला कर्नाटकात मेडिकल कॉलेजला घातलं. आणि आबा डॉक्टर होऊन आल्यावर त्यांना दवाखाना टाकण्यासाठी जागा असावी म्हणून बहुदा १९८०-८१ साली सरांनी मेनरोडवर एक बांधलेली इमारत (माडी) खरेदी करून ठेवली.आणि आबा कर्नाटकातून एल.सी.इ.एच.ही आपल्या भागाला माहीत नसलेली वैद्यकीय पदवी घेऊन आले नी आबांचा दवाखाना सुरू झाला गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर १९८३ साली.करमाळा शहर व तालुक्यात बहुजन मराठा समाजातला डॉक्टर झालेला आबा हा पहिलाच डॉक्टर.
डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील यांचे निधन
त्यामुळं बहुजन समाजातील रुग्णांना आबाविषयी आपलेपणा वाटू लागला आणि विशेष म्हणजे आबांकडून केलं जाणारं अचूक निदान,त्यांचा हातखंडा आणि त्यांच्या हातून येणारा गुण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णसेवा करताना…पैसे असो वा नसो,कुणी परत आणून देवो अथवा न देवो पण रुग्णांवर निरपेक्ष भावनेनं उपचार करण्याचा आबांचा स्वभाव यामुळं अल्पावधीतच आबा संपूर्ण तालुक्यात नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले,त्यांच्या दवाखान्यात रोज रुग्णांची गर्दी मावेनाशी झाली.आबांचा दवाखाना सुरू झाला त्यावेळी मी कॉलेजला होतो,त्या काळी मौलालीच्या माळाकडे संध्याकाळी फिरायला जाणं हा करमाळेकरांचा शिरस्ता.आम्हा मित्रांचं टोळकं देखील त्याचं रस्त्याला असायचं.एके संध्याकाळी आबा सायकलला त्यांची बॅग लटकावून पायंडल मारत माळाचा चढ चढताना भेटले…विचारलं तेव्हा कळलं,आबा देवळालीच्या एका पेशंटला तपासायला चालले होते.खरंच त्यावेळी सुद्धा आम्हा मित्राना आश्चर्य वाटलं,आबा माघारी येईपर्यंत अंधार पडणार..त्या वेळी वाहतूक देखील इतकी तुरळक असायची की,अंधार पडला की लोखंडदऱ्याच्या पुलापाशी हमखास वाटमारी व्हायची.यावरून हे लक्षात यावं की…अल्पावधीत आबा बहुजन समाजाचे आवडते डॉक्टर कसे व का झाले ते !
पोलखोल भाग ३ : ‘गोविंदपर्व’च्या थकीत ऊसबिलासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत, स्वाभिमानीच्या भूमिकेत बदल
बहुजन समाजात एक परोपकारी डॉक्टर अशी प्रतिमा अल्पावधीतच निर्माण झालेल्या आबांच्या लोकप्रियतेचा फायदा उठविण्याच्या दृष्टीने तालुक्यातील तत्कालीन राजकारणी मंडळींनी जानेवारी १९९१ मध्ये झालेल्या आदिनाथच्या निवडणुकीत मोहिते-पाटील पॅनलमधून आबांना उमेदवारी दिली. मार्च १९९० मधील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार,मोहिते-पाटलांचे कट्टर समर्थक रावसाहेब पाटील यांचा जयवंतराव जगताप यांनी पराभव केल्याने तालुका राजकारणात मोहिते गट बॅकफूटवर गेला होता आणि या पार्श्वभूमीवर झालेली आदिनाथची निवडणूक मोहिते-पाटील गटाचे गिरधरदास देवी,रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने लढवली आणि या पॅनलला आबांच्या लोकप्रियतेचा फायदा तर मिळालाच पण विशेष म्हणजे आबा सर्वाधिक मतांनी निवडून आले आणि बावीसपैकी अठरा जागा या पॅनलला तर विरोधी तत्कालीन आमदार जयवंतराव यांचेसह त्यांचे फक्त चार उमेदवार निवडून आले.अशा रीतीने आबा राजकारणात आले.
पुढे गटांतर्गत झालेल्या कुरघोड्या,राजकारण यामुळे आबा आदिनाथचे व्हाईस चेअरमन व पुढे १९९५ च्या निवडणुकीत मोहिते गटाचे उमेदवार डिगामामा हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ठरलेल्या तडजोडीनुसार आबांना आदिनाथचे चेअरमन करण्यात आलं ते १९९६ च्या आदिनाथच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत ! या निमित्ताने एक नमूद करणं मात्र गरजेचं आहे… आबा हाडाचे डॉक्टर होते पण ते राजकारणाच्या प्रवाहात त्या काळात ओघाओघाने वा हेतुपुरस्सर जरी ओढले गेले तरी त्यांचा पिंड हा कधीच राजकारण्याचा नव्हता.अन्यथा १९९५ साली डिगामामाऐवजी तेच निश्चित आमदार झाले असते,कारण तितकी लोकप्रियता व वैद्यकीय पेशातून तेवढा लोकसंग्रह त्यांनी केलेला होता.
आज आबांविषयी हे सगळं लिहीत असताना आबांविषयीच्या अनेक आठवणी मनात दाटून आल्यात.आबांचा डॉक्टरकीत जम बसल्यावर अल्पावधीतच त्यांनी थोरला भाऊ या नात्यानं धाकट्या भावंडांचे शिक्षण,लग्न-कार्ये या सगळ्या जबाबदाऱ्या आस्थेने तर पार पाडल्याच पण त्याबरोबरच एकत्र कुटुंबपद्धती शेवटपर्यंत टिकवून समाजासमोर एक आदर्श ठेवला,जे आजच्या काळातले अतिशय दुर्मिळ उदाहरण समजावे लागेल.स्नेक-बाईट पेशंटला बरं करण्याबाबतीत तर आबांची सर्वदूर ख्याती होती.त्या बाबतीत लोक त्यांना गमतीने “सापवाला डॉक्टर” म्हणायचे.एकदा भोसे गावचा एक सर्पदंश झालेला पेशंट रात्रीच्या वेळी त्याच्या नातलगांनी उपचारासाठी आबांकडे आणला आणि नेमके आबा जागेवर नव्हते.पेशंट दवाखान्यात येईपर्यंत चांगला ठणठणीत होता पण…आबा नाहीत हे ऐकल्यावर,मी आता वाचणार नाही असं म्हणून अवघ्या काही मिनिटात दवाखान्यातच मरण पावला ! रुग्णांच्या दृष्टीने त्या अर्थाने आबा हे डॉक्टर रूपातील देवच होते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
बऱ्याचदा आबा निवांत असताना भेट झाली की आमच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. आबांचं बोलणं,वागणं सगळंच मोकळं-धाकळ,भरभरून, मनापासून असायचं.इतका मोकळ्या मनाचा,उदार मनाचा,प्रेमळ अंत:करणाचा,यशप्राप्ती होऊनदेखील सदैव तळागाळातल्या समाजाशी नाळ जोडून ठेवलेला माणूस मी फक्त आबातच पाहिला.आबांनी त्यांची सारी पुण्याई रोहनला तालुक्यातील सर्वात मोठं असं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण करून त्याच्या पाठीशी उभी केलीय.या पुढं हा वारसा तसंच एकत्र कुटुंबपद्धतीचा वारसा धाकटा बंधू संतोष,अभिजित,अजिंक्य हे निश्चितच सांभाळतील हा विश्वास आहे. ही सगळी जगरहाटी चालत राहीलच आबा,पण तुम्ही इतक्यात जायला नको होतं…तुमचं असं अकल्पित,अचानक जाणं कधीच मनातून जाणार नाहीये आबा.आयुष्यातल्या प्रत्येक सुख- दुःखाच्या क्षणी तुमच्या नसण्याची उणीव,एका थोरल्या भावाचं प्रेमळ छत्र कायमचं हरवल्याचा सल हा सदैव मनाला कुरतडत रहाणार आहे.
आबा…खरंच तुम्ही जायला नको होतं हो !
-विवेक शं. येवले, करमाळा
दि.०३/०९/२०२४
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला.