सोलापूर : सोलापूर विमानतळाचे उद्घाटन गुरुवारी (26 सप्टेंबर 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे होणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळावर नव्याने करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्यानिमित्ताने विमानतळ प्राधिकरण प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी करून आढावा घेतला.
उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूने, विमानतळ प्राधिकरणचे बनोथ चांप्ला त्यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळावरील सर्व कामकाजाची पाहणी करून पुणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या उद्घाटन समारंभाच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरणाने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
सोलापूर विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून लायसन्स मंजूर
सोलापूर : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयचे (DGCA) 11 व 12 सप्टेंबरला सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करून गेले होते. यामध्ये विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीएकडून करण्यात आलेली होती. विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरण कडून पूर्ण करण्यात आलेली असल्यामुळे आज डीजीसीएकडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे व उतरण्याचे परवाना (लायसन्स) मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
तत्पूर्वी ब्युरो ऑफ सिविल एव्हिजन सिक्युरिटी (नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो) च्या अधिकाऱ्यांनी होटगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली. विमानतळ प्राधिकरण कडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आलेले होते. त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी आली होती. तपासण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीजीसीए कडून सोलापूर विमानतळाला आज विमान लँड होणे को टेकऑफ करण्याची लायसन्स प्राप्त झालेले आहे. त्यामुळे सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.