सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रे नगर येथे 30 हजार घरांचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे चावी वितरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच सोलापूर जिल्हा दौरा झाला. या दौऱ्याचे आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनास फक्त सहा दिवसाचा कालावधी मिळालेला होता. अत्यंत कमी कालावधीत जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित घेऊन केलेल्या सूक्ष्म नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रे नगर येथील गृह प्रकल्प हा असंघटित क्षेत्रातील कामगारासाठी राबविण्यात येत असलेला देशातील सर्वात मोठा गृह प्रकल्प आहे. या गृह प्रकल्पाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी झालेले होते. मागील काही महिन्यापासून या गृह प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना चावी वितरण कार्यक्रमासाठी मोदी सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. म्हाडा, रे नगर फेडरेशन यासाठी प्रयत्न करत होते. 12 जानेवारीला मोदी नाशिक व मुंबई जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्यात येऊन गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान कार्यालयातून 19 जानेवारी सोलापूर येथील कार्यक्रमासाठी येणार असल्याचे सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. प्रशासनाकडे कार्यक्रमाच्या तयारीसाठी फक्त सहा दिवस होते. कमी कालावधीत दौरा विना विघ्न यशस्वी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते.
त्यानंतर तात्काळ जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुख व कार्यक्रमाच्या आयोजक रे नगर फेडरेशन यांची संयुक्त बैठक घेण्यात आली व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून कार्यक्रम मुख्यमंत्री कार्यालयामार्फत प्रधानमंत्री कार्यालयास पाठवण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत रे नगरची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व त्या ठिकाणी 40 ते 50 हजार लाभार्थी बसण्यासाठी सभामंडप तयार करण्याच्या दृष्टीने जागेची निश्चिती करण्यात आली.
महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद यंत्रणा, म्हाडा, वीज वितरण, ग्रामीण पाणी पुरवठा व अन्य संबंधित विभागाचे अधिकाऱ्यावर प्रधानमंत्री कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या व त्यांची त्या जबाबदाऱ्यांसाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, म्हाडाचे अधिकारी श्री अटकले, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व अन्य विभाग प्रमुख यांनी दौरा नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रधानमंत्री यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी नियोजन करत होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेऊन सहा ते सात महिन्याचा कालावधी झालेला आहे. त्यातच पंतप्रधान मोदी यांचा दौरा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी सूक्ष्म व शिस्तबद्ध नियोजन केले.
कार्यक्रमाचे अनुषंगाने प्रत्येक विभागाला जबाबदारी देऊन ती जबाबदारी ते विभाग प्रमुख व्यवस्थितपणे पार पाडतात का यावर योग्य नियंत्रण ठेवून काम केले. कार्यक्रमाचा मंच, सभामंडप, त्यात सेक्शन वाईज कशा पद्धतीने व्हीव्हीआयपी, व्हीआयपी ते सर्वसामान्य नागरिक, लाभार्थी कशा पद्धतीने बसतील याबाबतचे नियोजन, कार्यक्रमात व कार्यक्रम झाल्यावर सभा ठिकाणी स्वच्छता, नागरिकांना भोजन, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, पाणीपुरवठा व्यवस्था, लाभार्थ्याला प्रधानमंत्री महोदय यांचे भाषण व सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पाहता यावा यासाठी जागोजागी मोठमोठ्या स्क्रीनची व्यवस्था तसेच पार्किंगच्या ठिकाणीही मोठ्या स्क्रीनची व्यवस्था, पोलिस बंदोबस्त या सर्व जबाबदारी प्रत्येकाकडून अत्यंत अचूकपणे करून घेण्याचे कौशल्य त्यांनी दाखवले. मोदी यांचे हेलीपॅड ते राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हेलिपॅडपर्यंत व त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता काटेकोरपणे होती की नाही याची माहिती स्वतः प्रत्यक्ष जाऊन घेत होते. तसेच प्रत्येक विभाग प्रमुख यांच्याशी थेट संपर्क करून सर्व यंत्रणाचा परस्परात योग्य समन्वय कशा पद्धतीने राहील यासाठी त्यांनी केलेले नियोजन अत्यंत नेटके होते.
रे नगर येथील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रचंड मोठ्या लोकांवर नियंत्रणासाठी आवश्यक असलेला पोलिस बंदोबस्त तसेच मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेला स्थानिक स्तरावरची सुरक्षेची व्यवस्था करण्याचे काम जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे बजावले.
मोदी यांच्या भाषणातील सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर यांचे मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मनी मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर तीर्थक्षेत्रा विषयी माहिती तसेच सोलापूर युनिफॉर्म निर्मिती व गारमेंटसची मोठी बाजारपेठ असून सोलापूरची चादर जगात प्रसिद्ध आहे, या बाबींची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिलेली होती.
प्रधानमंत्री महोदय यांचा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्वतः सकाळी सात ते रात्री एक ते दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष सभास्थळी जाऊन नियोजन करत होते व केलेल्या नियोजनाप्रमाणे प्रत्येकाकडून कामकाज करून घेऊन आवश्यक त्या ठिकाणी बदल करून घेत होते. याच दरम्यान जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना 102 डिग्री ताप आला. परंतु त्यांनी त्याचीही परवा न करता हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या कामात 102 डिग्रीचा ताप ही अडसर ठरू शकला नाही.