करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथे स्टेरिंग रोड तुटून एसटी उलटली होती. त्यामधील अपघातग्रस्तांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. त्याची दखल न घेतल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यातूनच आज (शुक्रवार) एसटी आगार प्रमुखांच्या पुतळ्याला दे धक्का आंदोलन केले जाणार होते. मात्र प्रशासनाकडून मागण्यापुर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे कांबळे यांनी सांगितले आहे.
रावगाव येथे स्टेरिंग रॉड तुटून बस अपघात झाला होता. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून सदर अपघातास जबाबदार चार कर्मचाऱ्यांवर खाते अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अपघातातील जखमी प्रवाशांना नियमानुसार तत्कालीन आर्थिक मदत त्याचवेळी रोखीने देण्यात आली आहे. पुढील अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. बसेस वेळेत सुटत नसलेल्या तक्रारीचे दखल घेऊन सर्व बस फेऱ्या नियोजित वेळेत मार्गस्थ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना दिलेल्या असून तशी खबरदारी घेण्यात येत आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बस स्थानकावरती पोलिस मदत केंद्र देखील उभारण्यात आले आहे.
संगम चौकात होणारी वाहतुकीची कोठे टाळण्यासाठी आज रोजी पासून वाहतूक वळविण्याबाबत संबंधितांना तात्काळ आदेश दिलेले आहेत. याबाबत शासन स्तरावर ती नवीन बसेस घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे., असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे कांबळे यांनी जाहीर केले आहे.