करमाळा (सोलापूर) : शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासहित थकीत ऊस बिल द्यावे या मागणीसाठी प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन झाले.
करमाळा तालुक्यातील काही साखर कारखान्यानी शेतकऱ्यांचे ऊस बिल वेळेत दिलेले नाही. हे थकीत ऊस बिल १५ टक्के व्याजासहित देण्याची मागणी यावेळी केली आहे. तालुक्यातील मकाई, आदिनाथ, भैरवनाथ व कमलाई साखर कारखान्याकडे ऊस बिल थकीत आहे. दरम्यान कमलाई कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा करून उर्वरित साडेतीन कोटी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
मकाई साखर कारखान्याने ऊस बिल जमा केल्याचे पत्र दिले आहे. मात्र १५ टक्के व्याजाची रक्कम जमा केलेली नाही. भैरवनाथ कारखान्यांने ऊस बिल जमा केले असले तरी १५ टक्के व्याजाची रक्कम देण्याबाबत त्यांनाही सूचना करण्याची सूचित करण्यात आले आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल व 15 टक्के रक्कम शिल्लक असल्याने माॅलिसेस विकून बिल देण्याबाबतच्या सूचना प्रशासनामार्फत करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आहे.
यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे, गणेश मंगवडे, सुदर्शन शेळके, बापू फडतरे, पोटेगावचे सरपंच प्रशांत नाईकनवरे आदी उपस्थित होते.