करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील कॅनलच्या सायपनचे काम त्वरित करून या हंगामात शेतकऱ्यांना पाणी द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली आहे. पोथरे येथे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली असून आमदार नारायण पाटील यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.
मांगी तलावातून बिटरगाव श्री येथील कॅनलला पाणी येते. नंदकुमार दळवी यांच्या घरामागे ओढ्यावरील सायपण खराब झाले आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी निधी दिला होता. त्या कामाचे भूमिपूजन करून महिना झाले मात्र ठेकेदार संथगतीने काम करत आहे. त्यामुळे पाणी आवर्तन सुरु असतानाही अडचण झाली आहे. या हंगामात त्याची दुरुस्ती होऊन शेतीसाठी पाणी मिळणे आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून याकडे त्वरित लक्ष द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सीना नदी कोरडी पडली असून पाण्यावाचून या भागातील ऊस करपू लागले आहेत. त्यात कॅनलचे पाणी शेतीला येणे आवश्यक आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी प्रा. शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी बिटरगाव श्री येथील अनेक शेतकरी उपस्थित होते.