करमाळा (सोलापूर) : नोकरी, शिक्षण व आरक्षणामधील अडचणींबाबत मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी भेट घेतली आहे.
बुधवारी (ता. ७) जरांगे हे सोलापूरमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता रॅलीसाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रा. झोळ यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मराठा समाज्यासह बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरी, शिक्षण व आरक्षणांमधील अडचणींविषयी चर्चा करण्यात आली.
सामान्य प्रशासन विभागाने जात पडताळणीबाबत काढलेल्या सरकार निर्णयामध्ये फक्त SEBC विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ती सरसकट सर्व मागासवर्गीय जातींना देण्यात यावी. बहुजन समाज कल्याण विभागाने १४ जून २०२४ रोजी काढलेला सरकार निर्णय SEBC, EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करावा. (१५५४ अभ्यासक्रमाबाबत). केंद्र सरकारचे EWS आरक्षण SEBC च्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणासाठी लागू करावे. OBC च्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह भत्ता डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्याप्रमाणे सरसकट लागू करावा. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे, निलेश शिंदे, सुहास काळे पाटील, भीमराव ननवरे आदी उपस्थित होते.