करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची खरी लढत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशीच होणार आहे, असे विधान करत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तीन नंबरला जातील, असा दावा रमेश बारस्कर यांनी केला आहे. करमाळ्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला.
रमेश बारस्कर हे वंचित बहुजन आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. या मतदारसंघात भाजपने खासदार निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार गटाला) देण्यात आली आहे. बारस्कर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले असून लोकसभाही वाचवण्यासाठी यावेळी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना ते म्हणाले, या मतदारसंघात आम्हाला चांगले वातावरण आहे. यावेळी आमची लढत ही राष्ट्रवादीशी होणार आहे. भाजपचे निंबाळकर यांनी कोणतेही काम केलेले नाही. ‘ईडी’, ‘सीबीआय’चा धाक दाखवून भाजप दबाव आणत आहे. मात्र निवडणुकीत मतदार त्यांना जागा दाखवेल.
पुढे बोलताना ते म्हणाले, माढा मतदारसंघातील माळशिरस व फलटण हे विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. हे सांगतानाच बारस्कर यांनी या मतदारसंघातील जातीय समीकरण ही स्पष्ट करून सांगितले आहे. प्रस्थापितांच्या विरुद्धची ही लढाई असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना हमी भाव देण्याच्यावेळी हे सर्व एकत्र बसून निर्णय घेतात, मात्र शेतकऱ्यांना चांगला भाव देत नाहीत, असेही ते म्हणाले आहेत.