मुंबई (अशोक मुरूमकर) : करमाळ्याच्या बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्वीजय बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी बोलताना रश्मी बागल यांचा करमाळ्याच्या संघर्षशील नेत्या असं म्हणत फडणवीस यांनी उल्लेख केला आहे.
करमाळ्याच्या राजकारणात महत्वाचा असलेल्या बागल गटाने आज (मंगळवार) मुंबईत भाजपत प्रवेश केला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे रणजितसिंह मोहिते पाटील, विद्या विकास मंडळाच्या सचिव विलासराव घुमरे, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, आदिनाथचे संचालक सतीश नीळ, ऍड. नानासाहेब शिंदे, आशिष गायकवाड, रितेश कटारिया, विलास भोसले, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रश्मी बागल यांचे मी स्वागत करत आहे. त्यांचे वडील दिगंबरराव बागल यांनी सहकारक्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली होती. सर्वसामान्यांकरता करता त्यांनी काम केले. त्यांच्यानंतर रश्मी बागल यांनी त्यांच्या कामाचा वसा घेतला आहे. अतिशय संघर्षाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. अशा संघर्षाच्या काळात रणजितदादा त्यांच्याबरोबर होते. प्रवेश करताना त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही. पूर्ण विश्वास ठेवला आहे. भाजप हे एक कुटुंब आहे. येथे सर्वजण एकमेकांची काळजी घेतली जाईल. रिटेवाडी उपसासिंचन योजनेतील अडचणी दूर केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.