करमाळा (सोलापूर) : पावसाळ्यात ओढ्याला आलेले पाणी अनेक घरांमध्ये शिरते त्यावर कायमचा उपाय काढला जाणार असून कुंभारवाड्यातील पूल नव्याने उभारून येथील प्रवास सुखाचा करणे हे माझे ध्येय आहे. सुमंतनगर भागात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारले जाणार असून प्रभागातील अंतर्गत रस्ते, गटारी, आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा मानस रवी जाधव यांचा आहे.
रवी जाधव हे करमाळा शहर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक १ चे उमेदवार आहेत. कोरोनात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन प्रभागातील तरुणांनी त्यांच्याकडे निवडणुकीत उतरण्याचा आग्रह धरला. त्यानुसार ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रभागातील सामाजिक कामात ते कायम सक्रिय असतात. वडील नारायण बजाबा जाधव यांनी कायम गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात दिला. तोच वारसा ते जपत आहेत. पहिल्यांदाच ते राजकारणात उतरले आहेत.
कोरोना काळात अनेकांच्या मनात भीती असताना रवी जाधव यांनी गरीब व गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. त्यांना किराणा किट, रुग्णांना फळ व जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या. गणेशोत्सव काळात त्यांचा मोठा सहभाग असतो. मुस्लिम समाज बांधवांचा मोहरम हा मोठा सण असतो. त्यातील ‘ताजा’चा (ढोला) मान जाधव कुटुंबीयांकडे आहे. मोठ्या भक्तिभावाने ते या उत्सहात सहभागी होतात. सर्वधर्म समभाव याप्रमाणे त्यांचे सामाजिक काम सुरु असते. कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे, या भावनेतून प्रभागातील वाद व तंटे घरीच मिठावेत याला त्यांचे कायम प्राधान्य राहिले आहे. महिला व तरुणांना रोजगार निर्मितीसाठी पाठबळ दिले जाईल.
प्रभागातील समस्या
प्रभागात सत्ताधाऱ्यांनी रस्ता, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असा आरोप नागरिकांचा आहे. कानडे वस्ती येथे नगरपालिकेचा रस्ता, वीज, नियमित पाणी पुरवठा असे प्रश्न आहेत. सुमंतनगर भागात स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे. झोपडपट्टी भागात पावसाळ्यात अनेक घरात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचे जगणे अवघड होत आहे.
काय केले जाणार
या प्रभागात एक बौद्धविहार व सर्वधमीयांसाठी सांस्कृतिक इतर कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह उभारले जाणार आहे. मुस्लिम समाज बांधवांना कायम आधाराचे स्थान देऊन काम केले जाणार आहे. कानडे वस्ती येथे नागरिकांच्या मागणीनुसार नगरपालिकेचा रस्ता केला जाईल. याशिवाय येथे नगरपालिकेची वीज व नियमित पाणी पुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे.
काकानगरीत काँक्रेट रस्ते केले जातील. सुमंतनगर येथे महिलांसाठी स्वच्छतागृह उभारले जाणार असून प्रभागात नियमित पाणी पुरवठा व स्वच्छतेला प्राधान्य देऊन कचरा उचलून स्वच्छ प्रभाग ठेवला जाईल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली जाईल. किल्ला वेस ते कर्जत रोड दरम्यानचा रस्ता चांगला करून या रस्त्यावरील कुंभारवाडा येथील पूल नव्याने बांधला जाणार असून येथील धोकादायक वाहतूक सुरळीत केली जाईल. प्रभागात चांगल्या प्रकारच्या भुयारी गटार केल्या जातील. मुस्लिम समाज बांधवांच्या मागणीनुसार कब्रस्तानचे सुशोभीकरण केले जाईल. कुंभारवाडा ते जळक्या ओढादरम्यानच्या ओढ्याचे सुशोभीकरण केले जाईल.
तरुणांसाठी काय?
या प्रभागातील तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व तालीम करण्याचा मानस आहे. प्रभागातील शाळा स्मार्ट करून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यावर भर राहणार आहे.
‘बदल हवा’
प्रभागातील तरुणांनी बदल हवा म्हणून माझी उमेदवारीसाठी निवड केली. निवडणूक झाल्यानंतर विरोधक मतदारांकडे फिरकले नाहीत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. असा आरोप आहे. मी येथे काम केले आहे. करायचे आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे विकासाचा बदल येथे नक्कीच दिसेल. सर्व तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना एकत्र करून जातीधर्माच्या पलीकडे जाऊन काम करायचे आहे. मतरुपी आशीर्वाद देऊन मला विजयी करावे, मी प्रभागाचा विकास करून दाखवेल, असे जाधव म्हणाले आहेत.
निधीसाठी काय?
करमाळकरांना या निवडणुकीत बदल हवा आहे. या निवडणुकीत मी सावंत कुटुंबियांच्या वतीने करमाळा शहर विकास आघाडीचा उमेदवार आहे. आमची यावेळी नक्की सत्ता येणार आहे, असा विश्वास आहे. त्यामुळे सावंत गटाचे मार्गदर्शक विठ्ठलअप्पा सावंत, पंचायत समितीचे माजी सदस्य ऍड. राहुल सावंत, माजी नगरसेवक संजय सावंत, सुनील सावंत, संतोष जाधव यांच्या माध्यमातून मंत्रालयातून प्रभागाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करेल. एकवेळ मला सेवा करण्याची संधी द्यावी, असे जाधव म्हणाले आहेत.
