करमाळा (अशोक मुरूमकर) : मांगी तलावाच्या उजव्या कालव्यावरील करंजेला जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक पूल तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रविकिरण फुके यांनी आमदार नारायण पाटील यांच्याकडे केली आहे. पाटील यांनी याची तत्काळ दाखल घेऊन सोलापुरातील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांना याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली असून हे काम त्वरित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पोथरे येथील आंनदी मंगल कार्यालय येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आमदार पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पवार, करमाळा उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा, आदिनाथचे संचालक डॉ. हरिदास केवारे, पंचायत समितीचे सदस्य स्वप्नील काळे, विठ्ठल सावंत यांच्यासह मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
आदिनाथचे संचाकल फुके यांनी आमदार पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मांगी उजवा कालवा साखळी क्रमांक १२/७०० वरील करमाळा ते करंजे रस्त्यावरील पूल पूर्णपणे धोकादायक झाला आहे. दोन्ही बाजूचे कठडे तुटले आहेत. याबरोबर त्याचा स्लॅब देखील निकृष्ठ झाला आहे. हा पूल दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे येथे धोका होऊ शकतो.
फुके यांनी पुढे म्हटले आहे की, ‘साखळी क्रमांक १८ ते २२ मधील भालेवाडी ते महादेवमाळ वस्ती कालव्यालगत असणारा सेवा पंथ अत्यंत खराब झाला आहे. त्यावरून प्रवास करणे कठीण झाले असून त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.’ आमदार पाटील यांनी हे विषय गांभीर्याने घेत तत्काळ संबंधिताना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवेदन देतेवेळी शिवाजीराव फुके व संभाजी बा. सरडे उपस्थित होते.
